(संगमेश्वर / एजाज पटेल)
गणितातील वेग, अचूकता आणि मानसिक कौशल्याच्या जोरावर संगमेश्वर येथील कु. सिया राहुल कुचेकर हिने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ११ व्या राष्ट्रीय अॅबॅकस आणि वैदिक मॅथ्स स्पर्धेत सियाने प्रथम क्रमांक पटकावत संगमेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यापूर्वी मास्टर एज्युकेशन अकादमीच्या वतीने इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या आंतरराज्यीय अॅबॅकस स्पर्धेत सियाने ‘चॅम्पियन अवॉर्ड’ पटकावला होता. त्या यशानंतर आता तिने थेट राष्ट्रीय पातळीवर झेप घेत आपल्या गणितीय कौशल्याची पुन्हा एकदा छाप उमटवली आहे.
न्यू इंग्लिश स्कूल, कसबा येथे शिक्षण घेणारी सिया ही संगमेश्वर येथील ‘वीरा इन्स्टिट्यूट’मध्ये अॅबॅकसचे प्रशिक्षण घेत आहे. इयत्ता तिसरीत असताना तिने आंतरराज्यीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. आता इयत्ता चौथीत असताना राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तिने आपल्या यशाचा आलेख कायम उंचावला आहे.
पुण्यात पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातील शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या आणि आव्हानात्मक फेऱ्यांमध्ये सियाने आपल्या वेगवान गणितीय कौशल्याने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या यशामुळे वीरा इन्स्टिट्यूट, न्यू इंग्लिश स्कूल कसबा तसेच संगमेश्वर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सियाच्या या यशामागे ‘वीरा इन्स्टिट्यूट’चे प्रशिक्षक धनंजय भांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करणे, सातत्यपूर्ण सराव घडवून आणणे आणि आत्मविश्वास वाढवणे यासाठी ते विशेष प्रयत्नशील असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सियाने आंतरराज्यीय स्पर्धेनंतर आता राष्ट्रीय स्तरावरही आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
सियाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही ती अशीच यशशिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

