(देवळे / प्रकाश चाळके)
“मदुराईप्रमाणेच देवरुख हेही आता माझे दुसरे घर आहे,” असे भावनिक पण ठाम शब्दांत सांगत तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे दैवत, पोंनुस् रयतु सेवा केंद्रम व पोंनुस् नॅचरल प्रॉडक्ट्सचे संस्थापक श्री. पोंनुस्वामी यांनी देवनगरी देवरुखात शेतकऱ्यांची मने जिंकली.
संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फार्मफ्रेश शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने पंचायत समिती देवरुख येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात दि. २३ नोव्हेंबर रोजी झालेला हा शेतकरी मेळावा कोकणातील शेतीसाठी ऐतिहासिक ठरला. या मेळाव्यास गटविकास अधिकारी श्री. लोकरे, श्री. शिंदे, तेलंगणाचे निवृत्त जॉइंट फलोत्पादन संचालक आर. विद्याभूषण, स्टाफकोचे विलास शेलार तसेच दुभाषी म्हणून एम. पांडे शेठ उपस्थित होते.
शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची आठवण
महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांचे ऐतिहासिक नाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयामुळे अधिक दृढ झाले, अशी आठवण करून देत श्री.पोंनुस्वामी यांनी देवरुखमधील उपस्थित शेतकऱ्यांना त्या परंपरेचा अभिमान दिला.
कोकणातील शेतकऱ्यांसाठी थेट मैदानात
कोकणातील लाल माती, पोषक हवामान असूनही शेती मागे पडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. “तुमचे प्रश्न आता माझे झाले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पन्न तिप्पट केल्याशिवाय मी थांबणार नाही,” असे ठाम वचन त्यांनी यावेळी दिले.
तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटकात हजारो शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या प्रयोगांमधून अनेक शेतकरी विक्रमी उत्पादक ठरले असल्याची माहिती आर. विद्याभूषण यांनी दिली.
विक्रमांची काही उदाहरणे:
भात: जागतिक सरासरी २ टन/एकर असताना ६ टन/एकर, तेही सेंद्रिय पद्धतीने
केळी: तिप्पट उत्पादन
ऊस: ९३ टन प्रति एकर
कापूस: ६ क्विंटलवरून २२ क्विंटल प्रति एकर
आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य त्यांच्या मार्गदर्शनाने सावरले आहे.
भाषण नव्हे, थेट कृती
भाषणांपेक्षा प्रत्यक्ष शेतभेटींवर भर देत त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांवर नजर टाकून समस्या ओळखल्या आणि तात्काळ उपाय सुचवले. “पीक सशक्त ठेवा, औषध गरजेपुरतेच द्या आणि पोषण मुलांसारखे करा,” असे साधे सूत्र त्यांनी मांडले. “मला एक वर्ष द्या. माझी पद्धत वापरा. मी तुम्हाला शेतीतून समृद्ध करून दाखवतो, निसर्गसंपन्न कोकणात शेती सोडणे योग्य नाही. इथून सर्व पिकांचे उत्पादन वाढवता येईल,” असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला.
स्थानिक सहभाग आणि सन्मान
संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फार्मफ्रेश कंपनीचे चेअरमन विलास शेलार व सल्लागार हेमंत तांबे यांनी पोंनुस्वामी यांच्यासोबत दीर्घकालीन सहकार्याचा निर्धार व्यक्त केला. क्रांती व्यापारी संघटनेतर्फे निखिल कोळवणकर यांच्या हस्ते त्यांना सप्तलिंगी लाल भात भेट देण्यात आला. “याचे उत्पादन वाढवून दाखवतो,” असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतभेटी आणि ग्रामस्थांचा सत्कार
मेळाव्यानंतर त्यांनी साडवली, सांगवे, तुळसणी, शिवणे आणि कसबा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांवर भेटी दिल्या. सांगवे–शिवणे येथे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
आज देवनगरी देवरुखात शेतकऱ्यांच्या देवाची पावले उमटली असून, कोकणातील शेतीसाठी हा दिवस नव्या आत्मविश्वासाची आणि नव्या युगाची सुरुवात ठरत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

