(मुंबई)
मुलुंड परिसरात सुरू असलेल्या मुंबई मेट्रोच्या कामादरम्यान भीषण दुर्घटना घडली. एलबीएस मार्गावर जॉन्सन गार्डन बसस्टॉपजवळ मेट्रोचा गर्डर स्लॅब अचानक कोसळून रिक्षा व कारवर पडला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना आज (शनिवारी) दुपारी सुमारे 12.30 वाजता घडली. स्लॅब कोसळताच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दुपारची वर्दळ अधिक असल्याने परिसरात एकच धावपळ उडाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्लॅब हटवून जखमींना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर जॉन्सन गार्डन परिसरात अर्ध्या तासाहून अधिक काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
या दुर्घटनेची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगितले. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल, तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबई शहराच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. कंत्राटदारांनी सर्व नियम पाळूनच काम करणे आवश्यक आहे. विकास करताना मुंबईकरांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सध्या या अपघाताची सखोल चौकशी सुरू असून मेट्रोच्या कामाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

