[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]
एखाद्या थरारपटालाही लाजवेल असा प्रसंग चिपळूणमध्ये अनुभवायला मिळाला. धावत्या वाहनातून उडी मारून पसार झालेल्या एका पांढऱ्या बोकडाने मगरींच्या वावरासाठी कुप्रसिद्ध असलेल्या शिवनदीत तब्बल १८ तास जीवावर उदार होत केलेली धडपड आणि त्याला पकडण्यासाठी नागरिकांनी राबविलेली शर्थीची मोहीम अखेर यशस्वी ठरली. या संपूर्ण घटनेने चिपळूणकरांना अक्षरशः खिळवून ठेवले असून, शहरात या अनोख्या बचावकार्याचीच चर्चा रंगली आहे.
घाट परिसरातून चिपळूणकडे वाहनातून आणण्यात येत असलेला हा पांढऱ्या रंगाचा बोकड २३ जुलै रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ग्रीन हॉटेल परिसरात अचानक वाहनातून उडी मारून पसार झाला. क्षणार्धात तो नजरेआड झाला आणि त्याचा शोध सुरू झाला. या संपूर्ण घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शी उसेद चिकटे यांनी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी बोकड शिवनदीच्या पात्रालगत दिसून आला. त्याच वेळी नदीच्या किनाऱ्यावर आलेल्या एका मगरीने त्याच्या अगदी समोरून शांतपणे पाण्यात प्रवेश केला. मात्र, मृत्यू समोर उभा असूनही बोकडाने क्षणभरही भीती न बाळगता थेट नदीत उडी घेतली आणि पेठमाप आयलंडच्या दिशेने पोहू लागला. शिवनदीत मोठ्या प्रमाणावर मगरींचा संचार असल्याने या नदीत पाय ठेवायलाही नागरिक धजावत नाहीत. अशा नदीत हा मुक्या जीवाने दाखविलेल्या धैर्याने उपस्थितांना अक्षरशः स्तब्ध केले.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर काही नागरिकांनी बोटीच्या साहाय्याने बोकडाला सुरक्षित पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळी तो त्यांच्या हालचाली ओळखून पुन्हा नदीत झेपावत होता. पेठमाप आयलंड, इंडियन जिम परिसर, मुख्य रस्ता, परशीकडील भाग अशा विविध ठिकाणी तो धावत गेला आणि पुन्हा पुन्हा नदीत उड्या घेत नागरिकांना चकवा देत राहिला. तीन ते चार वेळा नदी पार करत त्याने शोधमोहिमेची कसोटीच पाहिली.
दरम्यान, नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर मोठी गर्दी झाली होती. बोकडाच्या प्रत्येक हालचालीवर नागरिकांची नजर होती. मात्र, त्याच्या वेगापुढे आणि चपळाईपुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते. अखेर हा थरार संपविण्याचा निर्धार करत सूफियान कांद्री आणि जईद चिकटे यांनी जीवाची पर्वा न करता थेट नदीत उडी घेतली. वेगवान प्रवाह, मगरींचा संभाव्य धोका आणि बोकडाची धडपड या सर्व संकटांवर मात करत त्यांनी त्याला सुखरूप पकडले.
२३ जुलै रोजी रात्री वाहनातून पसार झालेला हा बोकड २४ जुलै रोजी दुपारी सुमारे बारा वाजता सुरक्षित ताब्यात घेण्यात आला. जवळपास १८ तास सुरू असलेल्या या थरारक बचावमोहीमेचा शेवट अखेर सुखद झाला. या मोहिमेत सुहेल मेस्त्री, जकी खतीब यांच्यासह अनेक युवक आणि स्थानिक नागरिकांनी सातत्याने सहभाग घेतला. एका मुक्या जीवाच्या जगण्याच्या जिद्दीने आणि त्याला वाचविण्यासाठी नागरिकांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेने चिपळूणकरांच्या मनात या घटनेने वेगळे स्थान निर्माण केले आहे. धैर्य, चिकाटी आणि माणुसकी यांचा प्रत्यय देणारा हा प्रसंग शहरासाठी अविस्मरणीय ठरला असून, या थरारक संपूर्ण घटनेची माहिती 24 न्यूजशी बोलताना प्रत्यक्षदर्शी उसेद चिकटे यांनी दिली आहे.

