(मुंबई)
अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच म्हाडाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या वंदना सूर्यवंशी यांच्याविरोधात राज्य शासनाने विभागीय चौकशी सुरू केली आहे. मुंबईतील तत्कालीन मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना दस्त नोंदणी प्रकरणात राज्य सरकारला तब्बल ४९ कोटी ३१ लाख रुपयांच्या मुद्रांक शुल्काचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर या प्रकरणातील चौकशीला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मधील एका दस्त नोंदणी व्यवहारात मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार बाजारमूल्य निश्चित करणे आवश्यक होते. मात्र, बाजारमूल्याचे चुकीचे मूल्यांकन केल्यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसुली नुकसान झाल्याचा ठपका वंदना सूर्यवंशी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांनी पदाचा गैरवापर केल्यासह शासकीय सेवेस अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तपासात उघड झाले कोट्यवधींचे नुकसान
पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कार्यालयाच्या तपासणी पथकाने मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी केली असता सुरुवातीला सुमारे ६७ कोटी ७४ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क कमी आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मुद्रांक अधिनियमाच्या कलम ५३-अ अंतर्गत पुनर्विलोकन करण्यात आले. या प्रक्रियेनंतर शासनाला प्रत्यक्षात ४९.३१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, संबंधित व्यवहारातील निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आणखी एका अधिकाऱ्यावर कारवाई
या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्याविरोधातही विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बाजारमूल्य निर्धारण प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याने दोन्ही अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महसूल विभागात खळबळ
राज्य सरकारच्या महसूल विभागातील हा मोठा आर्थिक गैरव्यवहार मानला जात असून, चौकशी अहवालानंतर आणखी काही अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाकडे महसूल विभागासह प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

