(गुहागर / सचिन कुळये)
गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आज शनिवार, १४ फेब्रुवारी ते मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी कोकणासह मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत.
भक्तांच्या हाकेला धावणारी ‘आई महामाई’
तवसाळ परिसरातील श्री देवी महामाई सोनसाखळी देवस्थानची ख्याती ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून सर्वदूर पसरलेली आहे. संकटात सापडलेल्या भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आणि माहेरवाशिणींच्या दुःखावर फुंकर घालणारी देवी अशी आई महामाईची भाविकांमध्ये दृढ श्रद्धा आहे. याच विश्वासातून दरवर्षी वर्धापन दिन आणि उत्सवाच्या काळात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
चार दिवसीय कार्यक्रमांची रूपरेषा
या वर्धापन दिन सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, १४ फेब्रुवारी: सकाळी षोडशोपचारे पूजन, सायंकाळी देवीचे रूप लावणे व अलंकार पूजन
रविवार, १५ फेब्रुवारी: मुख्य वर्धापन दिन सोहळा, दुपारी १ वाजता भव्य महाप्रसाद
सोमवार, १६ फेब्रुवारी: सकाळी सत्यनारायणाची महापूजा, रात्री निमंत्रित भजनी मंडळांची भजने
मंगळवार, १७ फेब्रुवारी: दुपारी २ वाजता सांगता समारंभ.
रविवार, १५ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० वाजता भक्ती आणि कलेचा संगम साधणारा भजनांचा जंगी ‘२० x २०’ सामना होणार आहे. या वेळी कोकण आणि मुंबईतील नामवंत भजनी बुवांमध्ये (बुवा सुयश मुरारी काराणे (भांडुप) आणि बुवा श्री गणेश मनोहर जांभळे (बांद्रा) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
या मंगलमयी सोहळ्यानिमित्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मोहन यशवंत गडदे आणि समस्त तवसाळ ग्रामस्थांनी सर्व भाविकांनी, विशेषतः गावच्या माहेरवाशिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
हा वर्धापन दिन सोहळा तवसाळसह संपूर्ण गुहागर परिसरासाठी भक्ती, श्रद्धा आणि एकोप्याचे प्रतीक ठरणार आहे.

