( लांजा )
लांजा तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजभिमुख पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समाजहिताची पत्रकारिता, ग्रामीण प्रश्नांची सातत्याने मांडणी आणि जनतेशी असलेली नाळ या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या शैलेश रमेश डोळस विद्यानगरीत आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात श्रीराम विद्यालय, तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय तसेच का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे सचिव संतोष पडवणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत
शाळेच्या प्रांगणात ढोल-ताशांच्या जल्लोषात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. टोयो सांस्कृतिक सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ औक्षण करून सत्कारमूर्तींचे अभिनंदन करण्यात आले. प्रास्ताविकात अमोल रेडीज यांनी शाळेची शैक्षणिक प्रगती, उपक्रम तसेच पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा परिचय उपस्थितांसमोर मांडला.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
कृषी, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना यावेळी गौरविण्यात आले. पुरस्कारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
गंगाधर ऊर्फ भाईसाहेब लाड जिल्हास्तरीय जीवनगौरव पुरस्कार – विजय शिवराम बेर्डे
स्व. रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार – दीपक दत्ताराम नागवेकर
जिल्हास्तरीय आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पुरस्कार – शशांक उपशेट्ये
आदर्श समाजभिमुख पत्रकारिता पुरस्कार – बाळकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर
मनोहर विठोबा ऊर्फ डॅडी कोकाटे जिल्हास्तरीय उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कार – अनिकेत चव्हाण
जिल्हास्तरीय कला गौरव पुरस्कार – धीरज साटविलकर
जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार – शरद वासुदेव चव्हाण
का. रा. ऊर्फ भाईसाहेब कोळवणकर जिल्हास्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार – जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था
तालुकास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार – सीताराम कदम
तालुकास्तरीय आदर्श कर्मचारी पुरस्कार – शशिकांत बाबल्या चव्हाण
बाळशेठ कोळवणकर आदर्श शेतकरी पुरस्कार – सूर्यकांत रघुनाथ सरदेसाई
सर्व पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती व मनोगते
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार अनिल गोसावी, लेखक-दिग्दर्शक व सिने-नाट्य अभिनेते असित रेडीज, राजापूर-लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, लांज्याच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, लांजा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक देवकन्या मेंदळे उपस्थित होते.
याशिवाय संचालक श्रीकृष्ण सरदेसाई, सहसचिव सुरेश चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष व सिने-नाट्य अभिनेते अमोल रेडीज, संचालक रवींद्र डोळस, वेरवली बुद्रुकच्या सरपंच वेदा कोळवणकर, वेरवली खुर्दचे उपसरपंच सूरज कुरतडकर, शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी सुरक्षा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय बेर्डे, धीरज साटविलकर, नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनिरीक्षक देवकन्या मेंदळे, नायब तहसीलदार अनिल गोसावी, अभिनेते असित रेडीज आणि सुभाष लाड यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण, समाजसेवा आणि माध्यमांची भूमिका यावर प्रकाश टाकला.
विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा सोहळा
अध्यक्षीय भाषणात संतोष पडवणकर यांनी सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले. समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे आणि विनोद बंडगर यांनी केले. पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षक, पालक, आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने हा पुरस्कार सोहळा प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

