(चिपळूण / वार्ताहर)
शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण वैभवाने नटलेली मांडकी–पालवण नगरी शुक्रवारी अक्षरशः दुमदुमून गेली. ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६च्या प्रारंभानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने संपूर्ण परिसराला उत्साहाची आणि लोककलेची उंची गाठून दिली. नमन, संकासूर, ढोल-ताशा, लेझीम पथके, पारंपारिक वेशभूषा, वारकऱ्यांची विठ्ठलभक्ती, देशभक्तीपर देखावे आणि ‘कांतारा’च्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणारी सादरीकरणे यामुळे पालवण नगरीत महाराष्ट्राची लोककला आणि भारतीय संस्कृतीचे जिवंत दर्शन घडले.

तालुक्यातील मांडकी–पालवण येथे कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने राज्यातील पहिले ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. काल शुक्रवार, दि. १३ पासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय (१३, १४ व १५ फेब्रुवारी) राज्यस्तरीय संमेलनाची सुरुवातच भव्य ग्रंथदिंडीने झाल्याने संमेलनाला ऐतिहासिक संदर्भ प्राप्त झाला आहे.
लोककलेचा जल्लोष, संस्कृतीचे जिवंत दर्शन
पालवण चौकातून निघालेल्या ग्रंथदिंडीत तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नमन मंडळे, वारकरी संप्रदाय, पारंपारिक कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सती-चिंचघरी हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या जोशपूर्ण लेझीम सादरीकरणाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. आंबतखोल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सादर केलेले समुहनृत्य विशेष आकर्षण ठरले.
ग्रंथदिंडीत राष्ट्रपुरुषांच्या व्यक्तिरेखा, विठ्ठल–रुक्मिणीचे देखावे, वारकरी संप्रदायाची पताका, संत साहित्याची प्रतिकात्मक मांडणी, विविध राज्यांच्या वेशभूषा व लोककला तसेच शेती व्यवस्थेचे प्रात्यक्षिक दर्शन घडविण्यात आले. ‘कांतारा’च्या वेशभूषेतून जंगल संवर्धनाचा दिलेला संदेश उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून गेला. ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या या दिंडीत हजारो विद्यार्थी, शेतकरी, महिला बचतगट आणि साहित्यप्रेमींनी सहभाग नोंदवला.
मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचा प्रारंभ
या अनोख्या संमेलनाचे आयोजन प्रथमच राज्यात होत आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आमदार शेखर निकम यांनी पालखीचे पूजन करून ग्रंथदिंडीला शुभारंभ केला.
पुस्तक प्रदर्शन व कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
संमेलनस्थळी ग्रामीण, कृषी आणि सहकार विषयक पुस्तकांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सायंकाळी आयोजित कवी संमेलनात कोकणातील स्थानिक कवींनी ग्रामीण जीवन, शेती, सामाजिक वास्तव आणि सांस्कृतिक जडणघडण यावर आधारित कविता सादर केल्या. रसिक श्रोत्यांनी प्रत्येक कवितेला मनापासून दाद दिली.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहासात ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार चळवळीचे मोलाचे योगदान राहिले आहे. या तीनही घटकांचे साहित्यिक व वैचारिक दर्शन घडविणारे हे संमेलन मांडकी–पालवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे संस्थेच्या प्रशस्त क्रीडांगणावर सुरू आहे.
परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नामवंतांची उपस्थिती
संमेलनादरम्यान ग्रामीण साहित्य, कृषी सुधारणा, सहकार चळवळ, कोकणातील सांस्कृतिक वारसा, शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण जीवनातील बदल आणि साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन या विषयांवर परिसंवाद, मुलाखती, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नामवंत साहित्यिक, कृषी तज्ज्ञ आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. या संमेलनात अभिनेते संजय खापरे आणि हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
आज भव्य उद्घाटन सोहळा
शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, आमदार भास्कर जाधव, किरण सामंत, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
ग्रामीण साहित्याला नवी दिशा
ग्रामीण साहित्य, कृषी आणि सहकार या त्रिसूत्री संकल्पनेवर आधारित हे संमेलन राज्यातील साहित्यविश्वात नवा आदर्श निर्माण करणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सध्या पालवण नगरीत साहित्य, संस्कृती, परंपरा आणि विचारांचा संगम अनुभवायला मिळत असून, कोकणातील साहित्यिक, शेतकरी, विद्यार्थी आणि रसिकांसाठी हे संमेलन वैचारिक व सांस्कृतिक पर्वणी ठरत आहे.

