(लांजा)
मुंबई–गोवा महामार्गावरील वाकेड येथील मुचकुंदी पुलाजवळ एसयूव्ही कारचा पुढील टायर अचानक फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या पादचाऱ्याला जबर धडक बसली. ही घटना रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. धडक झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य अशोक पाटील (वय ३९, रा. कल्याण पश्चिम, ठाणे) हे महिंद्रा एसयूव्ही ७०० (क्रमांक एमएच ०४ एमई २२००) घेऊन मुंबईवरून गोव्याच्या दिशेने निघाले होते. वाहन वाकेड येथील मुचकुंदी पुलाजवळ पोहोचताच कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या डावीकडे झुकत जाऊन पादचारी स्वप्निल गणपत बराम (वय ४०, रा. वाकेड) यांना जोरदार धडक बसली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या स्वप्निल बराम यांना तत्काळ रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. एस. रेवणे करत आहेत.

