(मुंबई)
बॉलिवूडचे नामवंत निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी कठोर भूमिका घेत सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या पाचही आरोपींना बुधवारी सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संघटित गुन्हेगारीशी संबंधित गंभीर स्वरूपाच्या या प्रकरणात मकोका लागू झाल्याने आरोपींसाठी जामीनप्रक्रिया अधिक कठीण झाली आहे. या कायद्याअंतर्गत तपास यंत्रणेला आरोपींची कोठडी ३० दिवसांपर्यंत ठेवण्याची तरतूद उपलब्ध झाली आहे. तसेच आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांऐवजी १८० दिवसांची मुदत पोलिसांना मिळणार आहे. मकोका अंतर्गत डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यास दंडाधिकाऱ्यांचे अधिकार दिले जातात. त्यामुळे आरोपींनी डीसीपीसमोर दिलेले जबाब अधिकृत मानले जातील आणि ते नंतर मागे घेणे शक्य होणार नाही.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेला शुभम लोणकर अद्याप फरार असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे तपासातून समोर आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपीही याच टोळीशी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. संघटित गुन्हेगारीतील सदस्याविरुद्ध मागील दहा वर्षांत किमान दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्यास मकोका लागू होऊ शकतो. लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध देशभरात विविध गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याच्या कथित सहकाऱ्यांवरही मकोकाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारातील प्रत्यक्ष शूटर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. वापरलेले हत्यारही सापडलेले नाही. या घटनेनंतर बॉलिवूड वर्तुळात खळबळ उडाली होती. अनेक सेलिब्रिटी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
गुन्हे शाखेने या प्रकरणात शस्त्रपुरवठा करणाऱ्या आसाराम फासळे उर्फ बाबू याला पुण्यातून अटक केली आहे. त्याच्यासह स्वप्नील बंडू सकट (२३), सिद्धार्थ दीपक येनपुरे (२०), समर्थ शिवशंकर पोमाजी (१८) आणि आदित्य ज्ञानेश्वर गायके (१९) यांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या एका आरोपीकडून जप्त करण्यात आलेली पिस्तूल गोळीबारात वापरलेली नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. फासळे गेल्या चार वर्षांपासून टोळीशी संबंधित असल्याचा संशय असून त्याने किती शस्त्रे पुरवली, याचा तपास सुरू आहे.
आरोपींतर्फे वकील अजिंक्य मिरगळ यांनी न्यायालयात सर्व आरोप फेटाळले. पोलिसांनी केवळ संशयाच्या आधारावर अटक केल्याचा दावा करत या घटनेशी आरोपींचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी नमूद केले.
शनिवारी रात्री उशिरा जुहू परिसरात शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने पिस्तूलातून गोळीबार केला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली. तांत्रिक विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)च्या साहाय्याने आरोपींचा माग काढत गुन्हे शाखेने पुण्यातील वारजे परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, फरार शुभम लोणकरचा शोध सुरू असून त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून या प्रकरणातील आंतरराज्यीय दुव्यांचाही छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोकासारख्या कडक कायद्याचा वापर करण्यात आल्याने या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

