(रायगड)
जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील धानसर गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विश्रांतीसाठी आलेल्या महिलांच्या खासगी क्षणांचे गुप्त चित्रीकरण करण्यासाठी एका रिसॉर्ट चालकाने स्वच्छतागृहात लपवलेला कॅमेरा बसवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी आरोपी मनोज चौधरी (वय ३५, रा. रांजनपाडा, खारघर) याला अटक केली आहे.
धानसर येथील खासगी फार्महाऊस काही काळासाठी मनोज चौधरी या व्यक्तीकडे भाडे तत्वावर देण्यात आले होते. फार्महाऊसच्या मूळ मालकाने ते भाडे तत्वावर आरोपीकडे दिले होते, आणि त्यानेच स्वच्छतागृहात गुप्त कॅमेरा बसविल्याचे निष्पन्न झाले आहे. २५ ऑक्टोबर रोजी मुंब्रा येथील एक कुटुंब काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी या फार्महाऊसवर आले होते. रविवारी सकाळी त्या कुटुंबातील एका तरुणाला स्वच्छतागृहातील बल्बच्या होल्डरविषयी संशय आला. तपास केला असता त्यात एक छोटा हिडन कॅमेरा लपवलेला असल्याचे उघड झाले.
फार्महाऊसमध्ये कॅमेऱ्यातील फुटेज पाहिल्यावर महिलांच्या आंघोळीचे दृश्य रेकॉर्ड झाल्याचे समोर आले. या प्रकारामुळे कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत त्वरित तळोजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून आरोपीला अटक केली. पुढील तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक सागर निकम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
तपासादरम्यान, पोलिसांनी चौधरीच्या मोबाईल फोनमधून १७ व्हिडिओ जप्त केले. काही व्हिडिओंमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश आहे, ज्यामुळे आरोपींविरुद्ध POCSO कायदा (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा) चे आरोप लावले गेले आहेत. त्याने इतर अनेक व्हिडिओ डिलीट केल्याचेही कबूल केले. सायबर तज्ञ आता डिलीट केलेले फुटेज परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तळोजा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण भगत म्हणाले, “आरोपीला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेत इतरांचा सहभाग आहे का याचाही आम्ही तपास करत आहोत.
या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणी गंभीर गुन्हा नोंदवला असून अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. तळोजा पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे, रिसॉर्ट किंवा फार्महाऊसमध्ये वापरताना अधिक सजग राहण्याचे आवाहन केले आहे.

