(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून रानगव्यांचा मुक्त संचार वाढला असून अनेक गावांच्या हद्दीत त्यांचा वावर दिसून येत आहे. अशाच पार्श्वभूमीवर मौजे लोवले, ता. संगमेश्वर येथे बुधवारी (दि. ११ फेब्रुवारी २०२६) रात्री घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. शेतातील कोरड्या व खोल विहिरीत एक नर, एक मादी आणि त्यांची तीन पिल्ले अशी पाच रानगवे अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत थरारक पण यशस्वी बचावमोहीम राबवली.
रात्री सुमारे ११.३० वाजता श्री संतोष प्रदीप खेडेकर यांच्या शेतातील पडीक विहिरीत रानगवे पडल्याची माहिती कृषी सहाय्यक श्री समीर दोरखडे यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच संगमेश्वर–देवरुख परिमंडळाचे वन अधिकारी व त्यांचे पथक आवश्यक साहित्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
प्रत्यक्ष पाहणीत संबंधित विहीर सुमारे १५ ते २० फूट खोल व अंदाजे १५ फूट व्यासाची असून पूर्णपणे कोरडी असल्याचे आढळले. बॅटरीच्या उजेडात तपासणी करताना एक नर, एक मादी आणि त्यांची तीन लहान पिल्ले भीतीच्या अवस्थेत विहिरीत उभी असल्याचे दिसून आले. विहिरीचे कडे तिरपे व उंच असल्याने त्यांना स्वतःहून बाहेर पडणे अशक्य होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने जेसीबीच्या सहाय्याने विहिरीच्या एका बाजूने माती टाकून उतार तयार करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत काळजीपूर्वक आणि संयमाने ही प्रक्रिया राबवण्यात आली, जेणेकरून कोणत्याही रानगव्याला इजा होणार नाही.
उतार तयार होताच सर्वप्रथम पिल्लांनी आणि त्यानंतर नर-मादी रानगव्यांनी नैसर्गिक मार्गाने बाहेर येत सुरक्षितपणे विहिरीबाहेर पाऊल ठेवले. सुमारे रात्री १.३० वाजेपर्यंत संपूर्ण बचावमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली. विशेष म्हणजे या रेस्क्यूदरम्यान कोणत्याही रानगव्याला इजा झाली नाही. बाहेर आल्यानंतर सर्व रानगवे शांतपणे जंगलाच्या दिशेने निघून गेली.
ही बचावमोहीम माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी श्री प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कार्यवाहीत वनपाल श्री सागर गोसावी, वनरक्षक श्री आकाश कडुकर, श्री सुरज तेली व श्री सहयोग कराडे यांनी मोलाची भूमिका बजावली.
रेस्क्यूदरम्यान मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी संयम राखत वनविभागाला पूर्ण सहकार्य केले. नागरिकांची जागरूकता आणि वनविभागाची तत्परता यामुळे पाचही रानगव्यांचे प्राण वाचल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात सध्या रानगव्यांचा वावर वाढत असून शेतजमिनी, पडीक विहिरी व मोकळ्या जागांमध्ये अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विहिरींना सुरक्षित कुंपण करावे आणि वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.
वन्यजीव संवर्धन आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचे हे सकारात्मक उदाहरण ठरले असून लोवले येथील ही यशस्वी बचावमोहीम तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

