( मुंबई )
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजप-शिवसेना महायुतीमधील जागावाटपाचा गुंता सुटत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम आकडे जाहीर झाले आहेत. मुंबईतील एकूण 227 जागांपैकी 137 जागांवर भाजप, तर 90 जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार आहे.
आज 30 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना, महायुतीने रात्री उशिरा जागावाटप जाहीर केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या वाटपात भाजप स्पष्टपणे ‘मोठा भाऊ’ ठरल्याचं चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सर्व 227 जागांवर एकमत झाल्याचा दावा केला जात होता. मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबत दोन्ही पक्षांचे नेते टाळाटाळ करत होते. युती पक्की असल्याचं सांगितलं जात होतं, पण आकडे जाहीर करण्याची कुणाचीही तयारी नव्हती.
राजकीय वर्तुळात भाजपला 150 ते 160 जागा, तर शिवसेनेला 60 ते 70 जागा मिळतील अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेने 90 जागा मिळवत अपेक्षेपेक्षा चांगला सौदा केल्याचं दिसत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न काही अंशी यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.
या वाटपामुळे मुंबईच्या महापौर पदावर शिवसेनेची पकड कमकुवत होऊ शकते, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथे महायुती एकत्र लढणार असली, तरी नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये युतीबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार असून शिंदेंची शिवेसना 87 आणि भाजप 40 जागांवर लढणार आहे, अशी माहितीही सांगितली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीरंग आणि नौपाडा या दोन प्रभागांच्या जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, या बैठकीत स्थानिक नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने हा वाद आता पूर्णपणे मिटला आहे.
महत्त्वाचं म्हणजे, दोन्ही पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही, त्यामुळे काही प्रभागांमध्ये अजूनही जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

