(मुंबई / वृत्तसंस्था)
वैश्यवाणी समाजाच्या OBC जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आमदार प्रमोद जठार आणि आमदार किरण सामंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या प्रश्नावर आज इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार प्रमोद जठार आणि आमदार किरण सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत वैश्यवाणी समाजाच्या OBC जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रक्रियेशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री अतुल सावे यांनी २० जून २००८ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार आवश्यक कार्यवाही करून शासन निर्णय घेण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यामुळे वैश्यवाणी समाजाचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर सकारात्मक निर्णय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वैश्यवाणी समाजाच्या जुन्या शासकीय अभिलेखांमध्ये ‘वैश्य’, ‘वैश्यवाणी’ आणि ‘वाणी’ अशा वेगवेगळ्या नोंदी आढळतात. या नोंदींमधील फरकामुळे पात्र नागरिकांना OBC जात प्रमाणपत्र मिळविताना तसेच जात पडताळणी करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासह युवकांच्या नोकरीच्या संधी आणि OBC प्रवर्गातील विविध शासकीय सवलतींच्या लाभावर होत होता.
ही बाब लक्षात घेऊन आमदार प्रमोद जठार यांनी २० जून २००८ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. यासाठी त्यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आमदार किरण सामंत यांनीही या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला.
आजच्या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे २००८ च्या शासन परिपत्रकानुसार पुढील कार्यवाहीला गती मिळणार आहे. त्यामुळे ‘वैश्य’, ‘वैश्यवाणी’ आणि ‘वाणी’ अशा नोंदींमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होऊन पात्र नागरिकांना OBC जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रक्रिया सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
तसेच वैश्यवाणी समाजाचा OBC यादीतील क्रमांक १९० वरील समावेश अबाधित ठेवून पात्र नागरिकांना OBCचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
या निर्णयामुळे वैश्यवाणी समाजातील विद्यार्थी, युवक, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार आणि OBC प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वैश्यवाणी समाजाच्या या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक पाऊल पडल्याबद्दल समाजाच्या वतीने आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत, मंत्री अतुल सावे आणि मंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
“वैश्यवाणी समाजाला त्यांच्या हक्काचे OBC लाभ मिळवून देण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार,” असा निर्धार आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.

