(नवी दिल्ली)
देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार आहे. याआधीच केंद्र सरकारने या योजनेतून अपात्र शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभावर कारवाई सुरू केली असून ४१६ कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी २९ जुलै २०२५ रोजी लोकसभेत दिली.
फेब्रुवारी २०१९ मध्ये, केंद्र सरकारने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे दिले जातात.
या योजनेत पारदर्शकतेसाठी नोंदणी आणि लाभार्थ्यांची पडताळणी अत्यंत काटेकोर पद्धतीने केली जाते. योजनेच्या सुरूवातीपासून सरकारने १९ हप्त्यांमध्ये एकूण ३.६९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला आहे. १६ जुलै २०२५ पर्यंतची माहिती PM-Kisan पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली आहे.
अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली सुरू
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या सत्यापित माहितीच्या आधारे, असे निदर्शनास आले की काही अपात्र लोकांनी या योजनेचा गैरवापर केला आहे. त्यामुळे सरकारने अशा लोकांकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. उत्पन्न कर भरणारे, सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी, संवैधानिक पदाधिकारी इत्यादी अपात्र गटात मोडतात. अशा शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्यास, संबंधित राज्य सरकारांना त्यांच्या कडून संपूर्ण रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशभरात ४१६ कोटी रुपयांची रक्कम अपात्र लाभार्थ्यांकडून वसूल करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरूच असून उर्वरित रक्कमही वसूल केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
पीएम-किसानसाठी पात्रता व नियम
योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही आवश्यक अटी लागू केल्या आहेत:
- शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक
- ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे बंधनकारक
- शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी देखील अनिवार्य
हे सर्व नियम पालन केल्यानंतरच लाभार्थ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
पीएम किसान यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?
- पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://pmkisan.gov.in/.
- आता ‘Beneficiary List’ लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर क्लिक करा.
- आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा आणि गेट रिपोर्ट वर क्लिक करा.
- सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.