(रत्नागिरी / प्रतिनिधी)
विवाह सोहळा म्हणजे दोन जीवांचा मिलाप; मात्र त्यात सामाजिक जाणीवेची जोड मिळाली, तर तो समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. चोरवणे येथे नुकताच पार पडलेला एक विवाह सोहळा याच अर्थाने वेगळेपण जपत उपस्थितांच्या मनात ठसा उमटवून गेला. येथील रहिवासी श्री. राजेंद्र सोनू कांबळे यांचे चिरंजीव प्रेम आणि चाफवली येथील सौ. माधवी महेंद्र कांबळे यांची कन्या चि. सौ. कां. साक्षी यांचा शुभविवाह १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.५३ वाजता मंगलमय वातावरणात संपन्न झाला. आप्तस्वकीयांच्या साक्षीने आणि शुभेच्छांच्या वर्षावात दोन कुटुंबांचा स्नेहबंध दृढ झाला.
परंपरेच्या साजिर्या चौकटीत रंगलेला हा सोहळा केवळ विधीपुरता मर्यादित न राहता सामाजिक आशयाने समृद्ध ठरला. युगपुरुष सम्राट बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान, चोरवणेचे अध्यक्ष श्री. गणपत शिवराम भायजे यांनी नवदांपत्याला शुभेच्छा देताना वृक्ष आणि पुस्तक अशी अर्थपूर्ण भेट प्रदान केली. वृक्ष हे पर्यावरणसंवर्धनाचे प्रतीक, तर पुस्तक हे ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचे द्योतक या प्रतीकात्मक भेटीतून नव्या संसाराची पायाभरणी विचारसमृद्ध भूमीवर व्हावी, असा संदेश देण्यात आला. विवाहासारख्या आनंदोत्सवात पर्यावरणप्रेम आणि ज्ञानसंवर्धनाचा विचार अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत साजरा झालेला हा विवाह सोहळा केवळ दोन जीवांचा नव्हे, तर दोन संस्कारांचा संगम ठरला. आधुनिकतेकडे वाटचाल करतानाही मूल्यांचा धागा घट्ट धरून ठेवणाऱ्या या उपक्रमाची परिसरात कौतुकाने चर्चा होत आहे.

