(शिर्डी)
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू असलेला लढा आता अधिक तीव्र होणार आहे. गेल्या वर्षी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या ऐतिहासिक आंदोलनानंतर बुधवारी (11 फेब्रुवारी) शिर्डीत पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत पुन्हा व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णायक निर्णय घेण्यात आला.
शिर्डीजवळील साई पालखी निवारा येथे झालेल्या या बैठकीला राज्यभरातील धनगर समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव वाढवण्याची सविस्तर रणनीती ठरवण्यात आली.
“घटनात्मक हक्कांचा प्रश्न” — समाजाचा दावा
धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी बैठकीत स्पष्ट केले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक तरतुदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळणे हा त्यांचा न्याय्य आणि कायदेशीर हक्क आहे. मात्र अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
गेल्या काही वर्षांत विविध समित्या, अहवाल आणि राजकीय आश्वासनांनंतरही ठोस निर्णय न झाल्यामुळे समाजात असंतोष वाढला आहे. शांततेच्या मार्गाने मागणी करूनही न्याय मिळत नसेल, तर व्यापक आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा सूर बैठकीत उमटला.
परीक्षा आणि ऊसतोड हंगामानंतर आंदोलन
सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तसेच ऊसतोड हंगामही सुरू आहे. त्यामुळे आंदोलनाची तारीख तात्काळ जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र परीक्षा आणि ऊसतोड हंगाम संपल्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर लाखोंच्या उपस्थितीत भव्य आंदोलन छेडण्याचा निर्धार करण्यात आला.
ही बैठक धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले, “धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न हा केवळ सामाजिक मुद्दा नाही, तर तो न्याय आणि घटनात्मक हक्कांचा प्रश्न आहे. सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”
बैठकीत पुढील आंदोलनासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नियोजन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यभर जनजागृती मोहीम राबवणे आणि विविध जिल्ह्यांमध्ये तयारी बैठका घेण्याचाही कार्यक्रम आखण्यात आला आहे.
पुढील टप्प्यात राज्यभर जनजागृती अभियान, जिल्हानिहाय तयारी बैठका, नियोजन समित्यांची स्थापना आणि आझाद मैदानावर लाखोंचा मोर्चा याबाबत नियोजन केले जाणर आहे. धनगर समाज लवकरच संघटितपणे रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. आता सरकार या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

