(पुणे)
सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पुण्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 85 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 22 कोटी 3 लाख 22 हजार 742 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीतील 8 जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबर 2024 ते 9 जानेवारी 2025 या कालावधीत आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले आणि एक लिंक डाउनलोड करण्यास सांगितले. संबंधित अॅप्लिकेशनद्वारे गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे सांगण्यात आले. त्यानुसार पीडित व्यक्तीकडून वेगवेगळ्या सात बँक खात्यांमध्ये एकूण 22 कोटींहून अधिक रक्कम जमा करून घेण्यात आली. मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता आरोपींनी संपूर्ण रक्कम हडप केली.
या प्रकरणी मुनिलकुमार सुरेंद्र सिंह (वय 51), आकाश चंद्रशेखर मराठे (वय 27), लाला केशव उमाप (वय 26), परमेश्वर दिलीप दाभाडे (वय 23), प्रथम जॉन श्रीसुंदर, विश्वजीत जनार्दन खंदारे, अभिजीत शशिल नाडे आणि दिशांत राजेंद्र कांबळे यांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पुढील तपासात आणखी आरोपींचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
तपासादरम्यान आरोपी लाला उमाप आणि परमेश्वर दाभाडे यांच्या बँक खात्यांचे किट संभाजीनगर येथील संशयितांकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तपास पथकाने तातडीने संभाजीनगर येथे जाऊन प्रथम जॉन श्रीसुंदर याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून विश्वजीत खंदारे याचा सहभाग उघड झाला. पुढील तपासात जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांचे किट, एटीएम कार्ड, पासबुक, इंटरनेट बँकिंग पासवर्ड आणि युजरनेम इतर आरोपींकडे हस्तांतरित केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून भावसिंगपुरा परिसरातून काही आरोपींना अटक केली.
गेल्या काही वर्षांत ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि नव्या गुंतवणूकदारांना लक्ष्य केले जात आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणूक सल्ल्यावर विश्वास न ठेवण्याचे, संशयास्पद लिंक किंवा अॅप डाउनलोड न करण्याचे तसेच बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन केले आहे. फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

