(पुणे)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण व्हावे आणि शरद पवार यांच्या पक्षानेही एनडीएसोबत यावे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. “अजितदादांना खरी आदरांजली द्यायची असेल तर हा निर्णय होणे आवश्यक आहे,” असे आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांनी मंगळवारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पवारसाहेबांची तब्येत उत्तम असल्याचे सांगितले. “माझी पवारसाहेबांशी भेट झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल,” असे आठवले यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शंका उपस्थित केल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. “अजित पवार मोठे नेते होते, त्यामुळे त्यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र मला हा अपघातच वाटतो. या प्रकरणाची चौकशी व्हावी, पण यामागे घातपात असल्याचे मला वाटत नाही. या विषयावर राजकारण करू नये,” असे त्यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांच्या मनात देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणताही राग नव्हता, असेही आठवले यांनी नमूद केले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले होते आणि अनेक दिवसांपासून अजित पवार यांचीही इच्छा होती की शरद पवार यांनी एनडीएसोबत यावे. “विलीनीकरणाबाबत अजित पवार सकारात्मक होते. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यायला हवेत,” असे ते म्हणाले.
रामदास आठवले यांनी २०१९ पासून आपले मत स्पष्ट करत सांगितले की, शरद पवार यांनी एनडीएसोबत यावे अशी त्यांची कायम इच्छा होती. “शरद पवार यांनी एनडीएसोबत येऊन राज्याच्या विकासासाठी काम करावे, असे मला वाटत होते. तसे झाले असते तर पवारसाहेब देशाचे राष्ट्रपती झाले असते. तो निर्णय तेव्हा झाला नाही, पण आता अजितदादांना खरी आदरांजली द्यायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण व्हावे आणि शरद पवार यांच्या पक्षाने एनडीएसोबत यावे,” असे आठवले म्हणाले.
दरम्यान, एपस्टीन फाईल्सबाबत विचारण्यात आले असता रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या आरोपांना फेटाळून लावले. “या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा स्वच्छ आहे आणि देशाचा विकास अत्यंत वेगाने व योग्य दिशेने सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

