(रायगड)
जिल्ह्यातील अलिबाग शहर आणि वायशेत येथे पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ₹४,१७,४२९ किमतीचा गुटखा आणि अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने भारतीय न्याय संहिता २०२३ व अमली पदार्थ नियंत्रण कायदा (NDPS) १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास, नकुल कुमार नंदलाल चौरसिया (वय ४३, रा. उत्तरप्रदेश) हा अलिबाग शहरात एमएच-४३-बीएन-४४७० क्रमांकाच्या क्विड कारमधून गुटख्याची विक्री करत असताना पोलिसांच्या हाती लागला. गाडीची झडती घेतल्यावर त्यात ‘विमल’, ‘RM&D’ पानमसाला, विमल तंबाखू यांसह प्रतिबंधित औषधींचा साठा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ₹३,६२,८४० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वायशेत येथे राम केवल रामप्रसाद निशाद (वय ६५) यांच्या घरी छापा टाकला. यावेळी ₹५४,५९९ किंमतीचा गुटखा आणि आयुर्वेदिक चरससदृश गोळ्यांचा साठा हस्तगत करण्यात आला. या गोळ्यांमध्ये ‘अनुभूती योग’ आणि ‘श्री महाकाल मुनक्कावटी’ यांसारख्या संशयास्पद औषधींचा समावेश आहे. या पदार्थांची रासायनिक चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे.
१६ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने राजपत्रात विमल गुटखा आणि तत्सम उत्पादनांवर बंदी घालण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. ही उत्पादने हानिकारक व व्यसनी असल्याने त्यांच्या साठवणुकी व विक्रीवर कायद्यानुसार बंदी आहे. असे असतानाही आरोपींनी ही उत्पादने विनापरवाना साठवून विक्री केली. त्यामुळे २७ जुलैच्या रात्री दीडच्या सुमारास अलिबाग पोलिस ठाण्यात गु.र.नं. १३१/२०२५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३, तसेच NDPS कायदा १९८५ अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईची नोंद अनिकेत अनंता पाटील (वय ३१) यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे. सदर कारवाईमुळे अलिबाग व परिसरात अवैध गुटखा विक्री व अमली पदार्थ साठवणुकीवर अंकुश बसण्याची शक्यता असून, यामागे असलेल्या पुरवठा साखळीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडीत घेण्याची मागणी करण्यात येईल.