(चिपळूण)
मुंबई–गोवा महामार्गावरील फरशीनाका परिसरात मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. पुढील वाहनाला बाजू काढण्याच्या प्रयत्नात भरधाव कारने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून कारसह एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
या अपघातात गणेश गोपिनाथ राणे हे कार चालक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त एसटी बस बोरिवली ते कणकवली या मार्गावर धावणारी असून बसचे चालक शिवराम सुधाकर राणे (रा. कणकवली) होते.
प्राप्त माहितीनुसार, फरशीनाका येथील पुलाजवळून एसटी बस जात असताना कार चालकाने पुढील वाहनाला बाजू काढण्यासाठी अचानक भरधाव वेगात कार वळवली. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली. या धडकेत बसच्या हेडलाईटसह समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून कारचाही चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी कार चालकाला रुग्णालयात हलविण्यात आले असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

