(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी)
न्यायालयीन आणि प्रशासकीय आदेशानुसार ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तेवरील अधिकृत सील व शिक्के तोडून बेकायदेशीररित्या प्रवेश करून तेथे वास्तव्यास राहिल्याचा गंभीर प्रकार चिपळूण तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पेठमाप येथील गणेशवाडी परिसरात १३ ते १७ जुलै २०२६ या कालावधीत हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वरदायनी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबईचे विशेष वसुली व विक्री अधिकारी सागर सुभाष कदम (वय ३२, रा. पेढे-घरवेवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याआधारे गौरी देवषी गवळी (६५), संतोष देवषी गवळी (४८), रवि देवषी गवळी (४२) आणि राजू देवषी गवळी (५१, सर्व रा. पेठमाप-गणेशवाडी, ता. चिपळूण) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मालमत्ता कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांच्या आदेशानुसार अधिकृतपणे ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतर वरदायनी सहकारी पतसंस्थेकडून मालमत्तेवर अधिकृत सील व शिक्के लावण्यात आले होते. मात्र, फिर्यादी यांनी १३ जुलै रोजी मालमत्तेची पाहणी केली असता संबंधितांनी सील व शिक्के तोडून बेकायदेशीररित्या मालमत्तेत प्रवेश केल्याचे आणि तेथे वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. या कृतीमुळे न्यायालयीन व प्रशासकीय आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३२९, २२३ व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २१२/२०२६ दाखल केला असून, घटनेमागील सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे. मालमत्तेच्या ताब्याशी संबंधित आदेशांचे उल्लंघन करून अधिकृत सील तोडण्याच्या घटनेमुळे या प्रकरणाला कायदेशीरदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

