( चिपळूण )
दाट जंगलाच्या कुशीत वसलेली तोंडली-धनगरवाडी अंधार आणि वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे अनेक वर्षांपासून त्रस्त होती. रात्रीच्या वेळी परिसरातील ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्कील ठरत होते. लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कनिष्ठ महाविद्यालय, डी.बी.जे. कॉलेज यांनी पुढाकार घेत सौरदिवे बसवून गावकऱ्यांच्या जीवनात उजेड आणला आहे.
या उपक्रमाअंतर्गत वाडीतील विविध ठिकाणी सौरदिव्यांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे रात्रीचा अंधार कमी होऊन ग्रामस्थांच्या सुरक्षिततेत लक्षणीय वाढ होणार आहे. शेतीकाम, जनावरांची देखभाल तसेच दैनंदिन हालचाली आता अधिक सुरक्षितपणे करता येणार आहेत. या उपक्रमासाठी गावातील मनोहर रामचंद्र कोकाटे यांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांची मागणी प्रत्यक्षात उतरली, असे नागरिकांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ. सुजाता खोत, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, माजी NSS कार्यक्रम अधिकारी अरुण जाधव तसेच विद्यमान कार्यक्रम अधिकारी अविनाश पालशेतकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी समाजासाठी पुढे येणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी NSS स्वयंसेवकांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सौरदिव्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष कामात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव अधिक दृढ झाली.
सौरदिव्यांमुळे केवळ प्रकाशाची सोय झाली नाही, तर ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुलांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळणार असून, महिलांना आणि वयोवृद्धांना रात्री निर्धास्तपणे वावरणे शक्य होणार आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या हालचालींवरही काही प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.
ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत NSS व डी.बी.जे. कॉलेज प्रशासनासह मनोहर कोकाटे यांचे आभार मानले. दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणणारा हा उपक्रम आशेचा किरण ठरत असून, भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

