( पुणे )
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांची प्रकृती सोमवारी अचानक खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्यासारखं काही नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
डॉक्टरांचा खुलासा : प्रकृती स्थिर, ICUची गरज नाही
रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर अभिजीत लोढा यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितलं की, “शरद पवारांना कफचा त्रास आहे. आवश्यक त्या सर्व तपासण्या करण्यात आल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना त्रास होत होता, मात्र आता स्थिती नियंत्रणात आहे. काळजी करण्याचं कारण नाही.”
रोहित पवारांची कार्यकर्त्यांना विनंती
शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले, “साहेबांची प्रकृती स्थिर आहे. कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये. त्यांना केवळ कफचा त्रास आहे. काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. ते आयसीयूमध्ये नसून फक्त स्वतंत्र रूममध्ये दाखल आहेत.”
राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्यानंतर थकवा वाढला
गेल्या काही काळापासून शरद पवार सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते. या वयात ते प्रामुख्याने मार्गदर्शकाची भूमिका बजावत असून, पक्षाचं नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे करताना दिसत आहेत. कुटुंबातील मतभेदांचा त्यांच्यावर मानसिक आणि राजकीय परिणाम झाल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
अलीकडच्या काळात शरद पवारांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. गेल्या आठवड्यात त्यांनी सलग अनेक दिवस बैठका घेतल्या, नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. सततच्या कामाचा ताण आणि थकव्यामुळेच त्यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं जात आहे. अलीकडील दिवसांत बारामती, पुणे आणि मुंबई येथे सातत्याने दौरे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी, तसेच सततच्या कार्यक्रमांमुळे थकवा आणि आजारपण वाढले असावे. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरंतर निरीक्षणाखाली आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्याला रवाना
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीहून पुण्याला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत पार्थ पवार देखील असल्याची माहिती आहे. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने पवारांवर पुण्यात उपचार सुरू असून, कुटुंबीयांमध्ये काळजीचं वातावरण आहे.
भेटीला राजकीय आणि भावनिक महत्त्व
सुनेत्रा पवार यांच्या या भेटीला राजकीय आणि भावनिक महत्त्व प्राप्त झालं आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरची ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार आज मुंबईत अधिकृत कार्यभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार पुण्यात जाऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत.

