( मुंबई )
मुंबईतील मालाड पूर्व येथील पालनगर भागात धक्कादायक समोर आली असून, किरकोळ वादातून मजुरांनी एकमेकांवर अॅसिड फेकल्याने एकूण आठ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, या घटनेत रस्त्याने जाणारे निष्पाप पादचारीही भाजल्याची बाब समोर आली आहे.
प्रभाग क्रमांक 42 मधील पालनगर परिसरात अनधिकृत प्लेटिंग युनिट्समध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांमध्ये अवघ्या 600 रुपयांच्या उधारीवरून वाद सुरू झाला. हा वाद काही वेळातच तीव्र हाणामारीत बदलला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. रागाच्या भरात मजुरांनी एकमेकांवर अॅसिड फेकण्यास सुरुवात केली. हे युनिट्स रस्त्यालगत असल्याने अॅसिडचे शिंतोडे पादचाऱ्यांवर उडाले आणि त्यांनाही गंभीर दुखापत झाली.
या हल्ल्यात संदीप सरोज हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित सात जखमींवर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच कुरार पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी समर बहादुर राजकुमार सिंह याला अटक करण्यात आली असून पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले आहेत. तथापि, या कारवाईवर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. घटनेवेळी रस्त्याने जाणाऱ्या काही व्यक्तींवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या मते, पालनगर परिसरात सुमारे 100 ते 125 अनधिकृत प्लेटिंग युनिट्स सुरू असून, त्यामध्ये धोकादायक रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या युनिट्सना स्थानिक पातळीवर संरक्षण मिळत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. अशा धोकादायक उद्योगांवर कारवाई न झाल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, अवैध उद्योगांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. अॅसिडसारख्या घातक रसायनांचा बेकायदेशीर वापर आणि साठा यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

