(मुंबई)
आगामी राजकीय आव्हाने आणि पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी रामदास आठवले यांनी मुंबईत मोठी संघटनात्मक फेरबदल मोहीम हाती घेतली आहे. आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व तालुका आणि वॉर्ड कमिट्या तातडीने बरखास्त करण्यात आल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
आझाद मैदानात अधिकृत घोषणा
आझाद मैदान येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे मुंबईतील जुनी कार्यकारिणी बरखास्त झाली असून, आता पूर्णपणे लोकशाही पद्धतीने नवीन नेतृत्वाची निवड होणार आहे.
५ एप्रिलपर्यंत निवडणुका बंधनकारक
रामदास आठवले यांच्या स्पष्ट आदेशानुसार, येत्या ५ एप्रिलपर्यंत मुंबईतील सर्व वॉर्ड आणि तालुका कार्यकारिणींच्या निवडणुका पूर्ण करून नवीन अध्यक्षांची निवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी २५ फेब्रुवारीपासून सदस्य नोंदणी अभियान मुंबईभर राबवले जाणार आहे. केवळ सक्रिय सदस्य नोंदणी केलेल्यांनाच या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
तरुणांना संधी देण्यासाठी धाडसी पाऊल
पक्षातील मरगळ दूर करणे आणि विशेषतः नवतरुणांना नेतृत्वाची संधी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोणतीही थेट नियुक्ती न करता निवडणुकीच्या माध्यमातूनच अध्यक्ष निवडले जातील, असा ठाम पवित्रा रामदास आठवले यांनी घेतल्याने इच्छुकांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, बाळासाहेब गरुड, विवेक पवार आणि सुनील मोरे यांसारखे पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.
मुंबईतील रिपब्लिकन पक्ष संघटनेला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम ५ एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले असून, येत्या काही आठवड्यांत मुंबईच्या राजकीय वर्तुळात या घडामोडींची मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.

