(कानपूर / बेगूसराय)
केदारनाथ यात्रेनंतर नंदा देवी एक्सप्रेसमधून रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या कानपूरच्या प्रज्ञा सिंह हिचा अखेर 6 दिवसांनंतर शोध लागला आहे. उत्तराखंडपासून उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाचा शेवट सुखद झाला असून प्रज्ञा बिहारमधील बेगूसराय येथे सुरक्षित अवस्थेत सापडली आहे.
5 मेच्या मध्यरात्री नंदा देवी एक्सप्रेस मधून अचानक गायब झाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली होती. अपहरण, अपघात किंवा गुन्हेगारीचा संशय व्यक्त केला जात असतानाच आता या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य समोर आलं आहे.
पतीसोबतच्या वादानंतर घेतला धक्कादायक निर्णय
शेखर चंद्र सुयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान प्रज्ञाचा पती मनीषसोबत मोठा वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात तिने पतीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. प्रज्ञाने पोलिसांना सांगितले की, मनीष झोपल्यानंतर ती शांतपणे ट्रेनमधून खाली उतरली. मात्र, रागाच्या भरात ती कोणत्या स्टेशनवर उतरत आहे आणि पुढे कोणत्या दिशेने जात आहे, याचाही तिने विचार केला नाही.
तिकीट नसतानाही दुसऱ्या ट्रेनने बिहार गाठलं
ट्रेनमधून उतरल्यावर प्रज्ञा स्टेशनवर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रेनमध्ये तिकीट नसतानाही चढली. ही ट्रेन थेट बिहारकडे जात असल्याची तिला कल्पनाही नव्हती. अखेर ती बेगूसरायला पोहोचली. तिथे गेल्यानंतर परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर तिने आपल्या आईला फोन करून आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिचे लोकेशन ट्रेस करून तिला शोधून काढले.
‘संपूर्ण डबा, वॉशरूम शोधलं पण प्रज्ञा नव्हती’
5 मेच्या रात्री प्रज्ञा आणि तिचा पती मनीष केदारनाथ यात्रेनंतर गाझियाबादकडे परतत होते. मनीषच्या माहितीनुसार, हरिद्वार पर्यंत सर्व काही सुरळीत होते. मात्र, मुझफ्फरनगर जवळ त्याला जाग आली तेव्हा प्रज्ञा सीटवर नव्हती. बराच वेळ ती परत न आल्याने मनीषने संपूर्ण डबा आणि वॉशरूममध्ये तिचा शोध घेतला. तिचा मोबाईलही बंद येत असल्याने त्याने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
CCTV बंद असल्याने पोलिसांची वाढली डोकेदुखी
या तपासादरम्यान पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रुरकी आणि मुझफ्फरनगरसारख्या महत्त्वाच्या स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे प्रज्ञा स्वतः उतरली की तिच्यासोबत काही अनर्थ झाला, हे शोधणे कठीण झाले होते. पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवर अनेक किलोमीटरपर्यंत शोधमोहीम राबवली होती. अखेर प्रज्ञा सुरक्षित सापडल्यानंतर तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून ती सध्या कानपूरमधील आपल्या घरी आहे.
या संपूर्ण घटनेनंतर एक अत्यंत भावनिक आणि गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. राग, भावना किंवा क्षणिक आवेशाच्या भरात घेतलेला एक निर्णय किती मोठा गोंधळ निर्माण करू शकतो, याचं हे जिवंत उदाहरण ठरलं आहे. पतीसोबत झालेल्या वादानंतर प्रज्ञाने अचानक ट्रेनमधून उतरून कुणालाही कल्पना न देता निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तिच्या कुटुंबीयांपासून ते पोलिस प्रशासनापर्यंत सर्वांचीच चिंता वाढली. कुटुंबीयांची मानसिक अवस्था तर अत्यंत वेदनादायक झाली होती.
एका क्षणाच्या रागातून घेतलेल्या निर्णयामुळे केवळ स्वतःलाच नव्हे, तर कुटुंबीयांना, प्रशासनाला आणि पोलिस यंत्रणेलाही किती मोठा मानसिक आणि प्रशासकीय ताण सहन करावा लागतो, हे या घटनेतून स्पष्ट झालं. सुदैवाने प्रज्ञा सुरक्षित सापडली आणि या प्रकरणाचा शेवट सुखद झाला. मात्र, प्रत्येक वेळी परिस्थिती इतकी सकारात्मक असेलच असं नाही. त्यामुळे भावनांच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, याचा विचार करणे आजच्या काळात अधिक महत्त्वाचे बनले आहे.

