(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २२ जुलै रोजीच्या जयंतीचा अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांच्या सूचीत समावेश केला आहे. यासंदर्भातील सुधारित परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले असून, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ही जयंती शासनाच्या निर्देशानुसार साजरी करण्यात येणार आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करून अजित पवार यांच्या जयंतीचा शासकीय सूचीत समावेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी लावून धरली होती.
शासनाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
हे परिपत्रक राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांनाही लागू राहणार असून, शासनाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार जयंतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

