(मुंबई)
राज्यात हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत संपली असून, अद्यापही ज्यांच्या वाहनांवर ही नंबरप्लेट बसवलेली नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाईल आणि त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
कधी सुरू होणार कारवाई?
परिवहन विभागाने 18 फेब्रुवारीपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. यात मुख्य लक्ष HSRP नसलेल्या वाहनांवर असेल. 31 डिसेंबर 2025 पूर्वी HSRP साठी नोंदणी केलेल्या वाहनधारकांना 15 दिवसांची सवलत दिली आहे. या ‘ग्रेस पिरीयड’मध्ये प्लेट बसवून घेतल्यास दंड व अडचणी टाळता येतील. राज्यातील सर्व खासगी व व्यावसायिक वाहनांवर ही कारवाई लागू होईल. .
दंडाची रक्कम आणि तपासणी
HSRP नसलेल्या वाहनांवर 1,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. यासोबतच तपासणीदरम्यान RC, वाहन विमा, प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) आणि चालकाचा परवाना यांचीही पडताळणी केली जाईल. कोणतेही कागदपत्र नसल्यास अतिरिक्त दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आणि महामार्गांवर तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. विशेषतः मुंबई,पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात HSRP बसवण्याचा प्रतिसाद कमी असल्यामुळे येथे कडक तपासणी केली जाणार आहे.
परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणा संयुक्तपणे रस्त्यांवर तपासणी करणार आहेत. फिटमेंट सेंटर्सवर ताण वाढला असून, अपॉइंटमेंट न पाळल्यामुळे काही वाहनधारकांमध्ये नंबर प्लेट्सचा साठा पडून असल्याची तक्रार आहे. प्रशासनाने वाहनधारकांना HSRP वेळेत बसवून दंड व अडचणी टाळण्याचे आवाहन केले आहे.
HSRP का आवश्यक आहे?
हाय-सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख पटवणे सोपे होते, चोरीच्या वाहनांचा मागोवा घेणे सुलभ होते आणि बनावट नंबर प्लेटचा गैरवापर रोखता येतो. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी HSRP अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

