( देवळे / प्रकाश चाळके )
हल्ली सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. त्यापैकी काही निरर्थक असले तरी काही युजर्स दर्जेदार, कौतुकास्पद कंटेंटही शेअर करताना दिसतात. सुंदर नृत्य, संगीत, रेसिपी, लेखन अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर झळकत असतानाच आता एक छोटासा तुफान परफॉर्मर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय.
कोकणातील, विशेषतः ग्रामीण भागातील लोककला जिवंत ठेवण्याचं काम आजही अनेक मंडळे करत आहेत. त्यातच देवरुखचा अवघा ८ वर्षांचा श्लोक देवरुखकर सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शिवशंभो नाट्य नमन मंडळाचं काही दिवसांपूर्वी मुंबईत सादरीकरण झाले. या नमनमध्ये श्लोकने ‘गौळणी’ची स्त्री भूमिका अप्रतिम रित्या साकारत अप्रतिम नृत्य सादर केले. त्याचा हा परफॉर्मन्स इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.
प्राथमिक शाळेत शिकणारा हा लहानगा सुरुवातीपासूनच कलाप्रेमी. आजच्या मुलांना लहानपणीच आपले छंद ओळखता येतात, त्यात श्लोकचा उत्साह तर आणखी वेगळाच. नृत्य, अभिनय आणि लोककलाकडे त्याचं आकर्षण असल्याने तो नमनकलेत उतरला आणि पहिल्याच प्रयत्नात सगळ्यांचे मन जिंकले.
याबाबत श्लोकशी बोलताना त्याने सांगितले, “आपली लोककला टिकून राहिली पाहिजे म्हणून मी आई आणि मामाला सांगितलं की, मला नमनमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यांनी लगेच पाठिंबा दिला. माझ्या आईने आणि माझ्या मामा संयोग यांनी मिळून तब्बल एक महिना माझी तालीम घेतली. आता रंगमंचावर आपली कला सादर करताना मला खूप अभिमान वाटतो.”
लहान वयात इतका आत्मविश्वास, इतकी तयारी आणि लोककलेकडे एवढं आकर्षण श्लोकचा हा व्हिडीओ फक्त व्हायरल नाही होत, तर कोकणातील लोककलेचा वारसा पुढे नेणाऱ्या पुढच्या पिढीची आशादायी झलकही दाखवतोय.

