(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक गजानन मोघे (वय ५३) यांच्या अकाली निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कठीण परिस्थितीवर मात करत दहावीपासूनच देवळे हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे कार्य केले.
१९ जानेवारी रोजी चाफवली शाळा क्रमांक १ येथे अध्यापन करत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. विद्यार्थ्यांच्या समोरच खुर्चीवर कोसळलेल्या मोघे यांची प्राणज्योत शाळेतच मालवली. या धक्कादायक घटनेने विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ शोकसागरात बुडाले.
या पार्श्वभूमीवर चाफवली शाळा क्रमांक १ येथे आयोजित शोकसभेत उपस्थितांचे अश्रू अनावर झाले. माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती विलास चाळके, पत्रकार प्रकाश चाळके, शिक्षिका वर्षाराणी कदम, संगीता मगदूम, शिक्षक काळे, केंद्रप्रमुख बोडेकर यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त करताना भावूक झाले. काही काळ सभागृहात नीरव शांतता पसरली होती.
देवळे हायस्कूल व देवळे ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आलेल्या शोकसभांमध्येही अशीच भावनिक वातावरण होते. अनेकांनी मोघे यांची ओळख मधाळवाणी शिक्षक, लेखक, कवी, समाजकार्यकर्ता, समालोचक आणि विद्यार्थ्यांचा लाडका गुरु अशी करून दिली. छत्रपती संभाजी महाराजांवरील त्यांचे निस्सीम प्रेमही उपस्थितांनी आवर्जून नमूद केले.
विश्वशांती प्रार्थनेने शोकसभेची सांगता करण्यात आली. गजानन मोघे यांच्या जाण्याने एक संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

