(खेड)
जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास केसर कंपनीच्या आवारात अचानक आग लागल्याची घटना घडली. कंपनीच्या मोकळ्या परिसरात लागलेल्या या आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीची माहिती मिळताच लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने आणि संयोजनाने केलेल्या प्रयत्नांमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण काय आणि या घटनेत किती नुकसान झाले, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर लोटे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

