( दुबई )
भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल टाकत दुबईनं ड्रायव्हरलेस RT6 टॅक्सी सेवा लाँच केली आहे. चीनच्या “बायडू अपोलो गो”च्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या स्वायत्त टॅक्सीतून दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी नुकताच जागतिक सरकार शिखर परिषदेसाठी (World Governments Summit) वैयक्तिकरित्या प्रवास केला. हा प्रवास दुबईच्या स्मार्ट आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेचं प्रतीक मानला जात आहे.
5 फेब्रुवारी 2026 रोजी मदीना जुमेराह येथे होणाऱ्या वर्ल्ड गव्हर्नमेंट्स समिटला जाण्यासाठी शेख हमदान यांनी RT6 ड्रायव्हरलेस टॅक्सीचा वापर केला. यावेळी बोलताना त्यांनी दुबईला “स्मार्ट, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम शहर” बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठीही शहरातील प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित करण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
RT6 ही अत्याधुनिक स्वायत्त टॅक्सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि 40 हून अधिक प्रगत सेन्सर्सवर आधारित आहे. या वाहनात हाय-प्रिसिजन लायडार, मल्टी-बँड रडार आणि प्रगत कॅमेऱ्यांचा समावेश असून, ते 360 अंशांत पादचारी, इतर वाहने, रस्त्यावरील अडथळे आणि ट्रॅफिक सिग्नल्स अचूकपणे ओळखते. रिअल-टाइम ट्रॅफिक विश्लेषण, हाय-डेफिनिशन मॅपिंग आणि डीप-लर्निंग अल्गोरिदमच्या साहाय्याने ही टॅक्सी मानवी हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेते.
दुबई प्रशासनानुसार, RT6 टॅक्सी शहरी वातावरणात सर्व ट्रॅफिक नियम पाळून सार्वजनिक रस्त्यांवर धावण्यास सक्षम आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा मेट्रो स्टेशन आणि प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या मार्गांवर सुरू होईल. जुमेराह, उम्म सुकेम आणि दुबई सिलिकॉन ओएसिससारख्या उच्च ट्रॅफिक क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
मार्च 2026 मध्ये 100 स्वायत्त टॅक्सींचा पहिला ताफा सार्वजनिक सेवेत दाखल होणार असून, 2026 च्या पहिल्या तिमाहीत या सेवेचा आणखी विस्तार केला जाईल. या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट ट्रॅफिक जाम कमी करणे, अपघातांचे प्रमाण घटवणे आणि रस्ते अधिक सुरक्षित बनवणे आहे.
तंत्रज्ञान जागतिक असलं तरी पायाभूत सुविधा पूर्णपणे दुबईत उभारण्यात आल्या आहेत. बायडू अपोलो गोने दुबई सायन्स पार्कमध्ये आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स आणि कंट्रोल सेंटर सुरू केलं आहे. सुमारे 2,000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या केंद्रातून रिअल-टाइम मॉनिटरिंग, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सेफ्टी सिम्युलेशन्स केल्या जातील. येत्या काही वर्षांत या सेवेअंतर्गत 1,000 पेक्षा अधिक ड्रायव्हरलेस टॅक्सींचा ताफा दुबईच्या रस्त्यांवर धावणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
ड्रायव्हरलेस टॅक्सी सेवेमुळे दुबईनं शहरी वाहतुकीत नवी क्रांती घडवून आणली असून, जगभरातील स्मार्ट सिटी उपक्रमांसाठी हा एक महत्त्वाचा आदर्श ठरत आहे.

