(पुणे / पिंपरी चिंचवड)
चाकण एमआयडीसीतील खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी, अपघात आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे तब्बल २० कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय जाहीर केल्याने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या कंपन्यांनी स्थलांतर केल्यास सुमारे ४ हजार जणांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता असून, तब्बल १,००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याचा दावा करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.
चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे रिंग रोडच्या पूर्व विस्तारासाठी तब्बल १०,५०२.३६ कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्प खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.
पुणे शहराबाहेरून वाहतूक वळवणार
पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पूर्व विस्तारीकरणाच्या प्रकल्पात पुणे-सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी (वळती) ते पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे (बु.) (शिवरे) या ३१.८०५ किलोमीटर लांबीच्या प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाचा समावेश आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरातून न नेता शहराबाहेरून वळवणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच चाकणसह औद्योगिक पट्ट्यातील वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
संपूर्ण १६८.९८१ किलोमीटर लांबीच्या पुणे रिंग रोड प्रकल्पाची सलगता सुनिश्चित झाल्यानंतर एकात्मिक प्रवेश नियंत्रित मार्गिका पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत ८० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती आहे. संपूर्ण प्रकल्प जून २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
१ इंटरचेंज, ३ मोठे पूल आणि ४ बोगदे
पुणे रिंग रोडच्या या मार्गावर दोन्ही दिशांना प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. मार्गाची नियोजित वेगमर्यादा ताशी १२० किलोमीटर राहणार आहे. प्रकल्पात एक इंटरचेंज, तीन मोठे पूल, पाच लहान पूल, १८ उन्नत मार्ग किंवा उड्डाणपूल आणि चार बोगद्यांचा समावेश आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करण्यात येणार असून, इंटरचेंजच्या परिसरात लँडस्केपिंगचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेसोबतच रस्त्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यावरही भर दिला जाणार आहे.
चाकण MIDCतील वाहतूक कोंडीला मिळणार दिलासा?
चाकण एमआयडीसी हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा औद्योगिक पट्टा आहे. मात्र, या परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि अपघातांच्या समस्येमुळे उद्योगांसमोर अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. २० कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय जाहीर केल्यानंतर हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.
पुणे रिंग रोडच्या पूर्व विस्तारामुळे शहरातील तसेच औद्योगिक परिसरातील वाहतूक बाहेरून वळवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे चाकण एमआयडीसीसह पुणे परिसरातील उद्योगांना वाहतूक कोंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला किती वेग मिळतो आणि त्याचा चाकणच्या औद्योगिक क्षेत्राला किती फायदा होतो, याकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

