(मुंबई)
झी 5 वरील ‘देवखेळे’ या वेबसिरिजमुळे महाराष्ट्र शासनाकडून जतन व संवर्धन केल्या जात असलेल्या ‘नमन-खेळे’ या पौराणिक व अत्यंत प्राचीन हिंदू लोककलेचा अवमान होत असल्याची भावना जनमानसात तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी संबंधित वेबसिरिजवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
कोकणात पारंपरिकरित्या मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिमग्याचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, अशा प्रकारच्या आशयामुळे गढूळ वातावरण निर्माण होणे योग्य नसल्याचे मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले. ‘देवखेळे’ या वेबसिरिजमुळे नमन-खेळे या प्राचीन हिंदू लोककलेच्या परंपरेला धक्का बसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करत सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती आशिष शेलार यांनी केली आहे. कोकणासह विविध भागांतूनही या वेबसिरिजविरोधात रोष व्यक्त होत असून, बंदीची मागणी अधिक तीव्र होत आहे.

