( नवी दिल्ली )
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण दिवंगत डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असाधारण योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांना दिला जाणारा हा देशातील सर्वोच्च विज्ञान सन्मान आहे.
राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित दिमाखदार समारंभात देशभरातील एकूण 25 वैज्ञानिक आणि संशोधन समूहांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कारांमध्ये विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा (शांती स्वरूप भटनागर) आणि विज्ञान टीम अशा विविध श्रेणींचा समावेश आहे.
जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार आयुका संस्थेचे संचालक आर. श्रीयानंद यांनी स्वीकारला. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या मूलभूत आणि दूरगामी संशोधनामुळे भारतीय विज्ञानविश्वाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

याशिवाय देशभरातील आठ शास्त्रज्ञांना ‘विज्ञान श्री’, तेरा जणांना ‘विज्ञान युवा’ पुरस्कार देण्यात आला, तर विज्ञानातील संघ पुरस्कार सीएसआयआरच्या अरोमा मिशनला प्रदान करण्यात आला. या सन्मानार्थींमध्ये महाराष्ट्रातील विविध संशोधन संस्थांमधील सहा शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
मुंबईतील भाभा अणुशक्ती केंद्राचे डॉ. युसुफ मोहम्मद शेख यांना अणुऊर्जा क्षेत्रातील योगदानासाठी, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील प्राध्यापक महान एम. जे. यांना गणितासाठी, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित यांना अभियांत्रिकी क्षेत्रासाठी, तर नागपूरच्या नीरी संस्थेतील डॉ. एस. वेंकट मोहन यांना पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘विज्ञान श्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘विज्ञान युवा’ पुरस्कारांतर्गत बेंगळुरू येथील जीवशास्त्रीय संस्थेच्या डॉ. दीपा आगाशे यांना जैविक शास्त्रासाठी, मुंबईच्या टीआयएफआरमधील प्रा. सब्यसाची मुखर्जी यांना गणितासाठी आणि पुण्यातील आयुका संस्थेचे प्रा. सुहृद मोरे यांना पदार्थ विज्ञानातील संशोधनासाठी गौरवण्यात आले.
या समारंभातून देशातील वैज्ञानिक संशोधन, नवकल्पना आणि तरुण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न अधोरेखित झाला.

