( पुणे )
मोबाईलवर गेम खेळण्यास कुटुंबीयांनी मज्जाव केल्याचा राग मनात धरून दहावीच्या परीक्षेत 80 टक्के गुण मिळवलेला 16 वर्षीय विद्यार्थी घरातून निघून गेल्याची घटना पुण्यातील कदमवाकवस्ती परिसरात घडली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याचा शोध सुरू असून, संबंधित विद्यार्थ्याबाबत माहिती असल्यास तातडीने लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आयुष जगदीश कानतोडे (वय 16) असे आहे. तो कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील रिव्हरव्ह्यू सिटी परिसरातील स्कायलार्क अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 80 टक्के गुण मिळवले होते. मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्यानंतर तो रागाच्या भरात घराबाहेर पडला.
घरातून निघताना त्याने कुटुंबीयांना “मी हॉटेलमध्ये काम करणार आहे,” असे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याचा कोणताही संपर्क झालेला नसून, कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. या प्रकरणी 27 जून रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137(2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आयुष कानतोडे किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे यांच्याशी 8329869675 या क्रमांकावर संपर्क साधावा.

