(मुंबई)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून, तापमानात सातत्याने घट होत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात निरभ्र आकाश आणि गुलाबी थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तर थंडीचा जोर आणखी वाढला असून, येत्या काही दिवसांत तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (१२ नोव्हेंबर) राज्यभर आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. दिवसा उन्हाचा तडाखा जाणवेल, परंतु संध्याकाळनंतर आणि रात्री गारवा अधिक जाणवेल.
मुंबई आणि कोकण विभागातही आज आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून, मुंबईत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे २१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि सौम्य उबदार वातावरण कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, परभणी, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीचा आनंद नागरिक घेत आहेत.

