(पुणे)
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन (गजाभाऊ) मेहेंदळे यांचे बुधवारी संध्याकाळी वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने इतिहासप्रेमी, संशोधक आणि शिवप्रेमी वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे पार्थिव आज सकाळी ११ वाजता पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
गजानन मेहेंदळे यांनी शिवकालीन संशोधन, युद्धशास्त्र आणि सामरिक धोरण या क्षेत्रांत अतुलनीय योगदान दिले. ‘श्री राजा शिवछत्रपती’ (खंड १ व २), Shivaji: His Life and Times, Tipu: As He Really Was, ‘शिवछत्रपतींचे आरमार’, ‘आदिलशाही फर्माने’, ‘इस्लामची ओळख’ अशी त्यांची ग्रंथसंपदा इतिहासप्रेमींसाठी अनमोल ठरली.
१९ डिसेंबर १९४७ रोजी जन्मलेले मेहेंदळे यांना लहानपणापासूनच इतिहासाची गोडी होती. १९६९ साली त्यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले आणि आयुष्यभर संशोधनाचा ध्यास घेतला. फारसी, उर्दू, पोर्तुगीज, जर्मन, फ्रेंच यांसारख्या अनेक भाषा शिकून त्यांनी शिवचरित्राच्या मूळ साधनांचा अभ्यास केला. याच पायावर उभे राहून त्यांनी शिवाजी महाराजांवरील सखोल संशोधन साकारले.
त्यांचा इंग्रजी ग्रंथ Shivaji: His Life and Times (सुमारे १००० पाने) आणि मराठीतील श्री राजा शिवछत्रपती (सुमारे २५०० पाने) हे संशोधनाचे मैलाचे दगड ठरले. या ग्रंथांमध्ये जवळपास सात हजार ऐतिहासिक संदर्भ नोंदवले आहेत. औरंगजेबाच्या धार्मिक धोरणावर त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर होता.
गजानन मेहेंदळेंची प्रमुख पुस्तके
- Shivaji: His Life & Times
- श्री राजा शिवछत्रपती (भाग 1 व 2) (मराठी ग्रंथ).
- छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (मराठी)
- इस्लामची ओळख -(भारतातील इस्लामी राजवटीचे धार्मिक धोरण या विषयावर).
- आदिलशाही फरमाणे ( ऐतिहासिक दस्तऐवजांवर आधारित एक ग्रंथ)

