(चिपळूण)
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने मांडकी पालवण येथील भव्य क्रीडांगणावर दि. १३, १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनास ग्रामीण चळवळीत कार्यरत कार्यकर्ते, कृषी क्षेत्राशी निगडित तज्ज्ञ, सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार प्रमुख डॉ. सौ. शमिका चोरगे यांनी केले आहे.
ग्रामीण समाजजीवन, शेती, सहकार आणि बदलत्या काळातील आव्हाने या विषयांवर विचारमंथन घडवून आणण्याच्या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय साहित्य संमेलनात नामवंत साहित्यिक, अभ्यासक, विचारवंत, कृषी तज्ज्ञ आणि सहकार चळवळीतील अनुभवी कार्यकर्ते सहभागी होणार असून विविध परिसंवाद, व्याख्याने, कवी संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रश्न, शेतीतील नव्या संधी, सहकार चळवळीची दिशा आणि साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
मांडकी पालवण येथील प्रशस्त क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात हे संमेलन होणार असून, ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीला नवी दिशा देणारे हे संमेलन ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण, कृषी आणि सहकार क्षेत्राशी नाळ जोडलेल्या प्रत्येकासाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामीण, कृषी व सहकार चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी, अभ्यासक आणि साहित्यप्रेमींनी या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सौ. शमिका चोरगे यांनी केले आहे.

