(मुंबई)
राज्यात सर्वत्र विखुरलेल्या आणि कुठलेही अद्ययावत मोजमाप नसलेल्या वक्फ मंडळाच्या अखत्यारीतील मालमत्ता तसेच जमिनींचे जिओ मॅपिंग करण्याचा निर्णय अल्पसंख्याक विभागाने घेतला आहे. तज्ज्ञ संस्थेच्या मदतीने या सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून, यामुळे प्रथमच राज्यात वक्फच्या किती मालमत्ता आहेत, त्यावर किती अतिक्रमण आहे, याची अचूक आणि अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.
मागील काही दिवसांपासून वक्फ मंडळाचा मुद्दा चर्चेमध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यामधील सर्व वक्फ मंडळाच्या जमिनींचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यातील सर्व वक्त मंडळाच्या जागांचे जिओ मॅपिंग करण्यात येणार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय अल्पसंख्यांक विभागाने दिलेला आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे अतिक्रमण होण्यावर टाच येणार आहे.
राज्यामध्ये वक्फ मंडळाच्या एकूण २३ हजार ५६६ मालमत्ता आहेत. त्या वक्फ जमिनींचे क्षेत्रफळ ३७ हजार ३३० हेक्टर इतकं आहे. अल्पसंख्यांक विभागानुसार मालमत्तांची संख्या अंदाजे २७ हजार आहे. अल्पसंख्यांक विभागानुसार क्षेत्र ४० हजार ४६८ हेक्टर असल्याची माहिती आहे.