(वॉशिंग्टन)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरोधात पुकारलेली मोहीम आता अधिक तीव्र केली असून, तिचा मोठा फटका भारतीय समुदायालाही बसला आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) जाहीर केलेल्या सर्वात धोकादायक गुन्हेगारांच्या यादीत तब्बल 89 भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश असल्याचा खुलासा झाला आहे. या कारवाईमुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायात मोठी खळबळ उडाली असून, ट्रम्प प्रशासनाच्या कठोर इमिग्रेशन धोरणाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा परिणाम मानला जात आहे.
डीएचएसने ‘HHS.GOV/CRIMINAL-ILLEGAL-ALIENS’ नावाचं एक विशेष पोर्टल सुरू केलं असून, यामध्ये सुमारे 25 हजार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अवैध स्थलांतरितांची सविस्तर माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. या यादीत हत्या, लैंगिक अत्याचार, अमली पदार्थांची तस्करी आणि हिंसक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या पोर्टलवर संबंधित गुन्हेगारांचे नाव, छायाचित्र, गुन्ह्याचा तपशील आणि राष्ट्रीयता उघडपणे जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत भारतीय वंशाच्या 89 व्यक्तींचा समावेश होणं ही गंभीर बाब मानली जात आहे. यामध्ये अमनदीप मुल्तानी आणि हरजिंदर सिंह यांसारख्या व्यक्तींची नावे समोर आली असून, त्यांच्यावर अमली पदार्थांच्या तस्करीचे गंभीर आरोप आहेत. अमेरिकन नागरिकांना अशा व्यक्तींचा त्रास सहन करावा लागू नये, ज्यांना देशात राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असा ठाम दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे.
ही तर फक्त सुरुवात
गृह सुरक्षा विभागाने स्पष्ट केलं आहे की, ही यादी केवळ एक प्राथमिक ‘स्नॅपशॉट’ असून प्रत्यक्षात पकडल्या गेलेल्या आणि शोधात असलेल्या गुन्हेगारांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असू शकते. जोपर्यंत प्रत्येक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अवैध स्थलांतरिताला देशाबाहेर हाकललं जात नाही, तोपर्यंत ही कारवाई थांबणार नाही, असा इशाराही डीएचएसने दिला आहे.
दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण तापलं आहे. डेमोक्रॅट खासदारांनी या कारवाईला विरोध दर्शवत डीएचएसचा निधी रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणावी, एजंटनी मास्क काढावेत आणि बॉडी कॅमेरे वापरावेत, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, ट्रम्प सरकार आपल्या कठोर भूमिकेवर ठाम असून माघार घेण्यास तयार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
भारतीय समुदायावर परिणाम?
तज्ज्ञांच्या मते, या यादीमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जरी यादीतील व्यक्ती गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी असल्या, तरी सर्वसामान्य भारतीय स्थलांतरितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मानवाधिकार, स्थलांतर धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने ट्रम्प यांची ही कारवाई भविष्यात मोठ्या वादाचं कारण ठरू शकते, असं मत व्यक्त केलं जात आहे.

