(पिंपरी चिंचवड)
अभ्यासाचा ताण आणि परीक्षेच्या भीतीतून बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. ६) दुपारी पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात उघडकीस आली. संत तुकारामनगर, भोसरी येथे राहणारा प्रणय सुनील खैरे (वय १७) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय हा भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. कॉलेजमधील प्रकल्प वेळेत पूर्ण न होणं आणि प्रात्यक्षिक परीक्षा न दिल्यामुळे तो मानसिक तणावात होता. याच कारणामुळे तो काही दिवसांपासून चिंतेत असल्याचं मित्रांनी जवळच्या नातेवाईकांनी सांगितलं.
शुक्रवारी प्रणय हा त्याच्या आईसोबत राजमाता जिजाऊ महाविद्यालयात परीक्षेचं हॉल तिकीट आणण्यासाठी गेला होता. त्यानंतर आई कामानिमित्त बँकेत गेली होती, तर वडील गावाकडे गेले होते. घरात एकटाच असताना प्रणयने टोकाचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक ताण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, परीक्षेचा ताण, अपूर्ण अभ्यास, अपयशाची भीती यामुळे अनेक विद्यार्थी नैराश्यात जातात. अशा वेळी पालकांनी मुलांवर अतिरिक्त दबाव न आणता त्यांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचा किंवा परीक्षेचा ताण जाणवत असल्यास पालकांनी वेळीच समुपदेशन घ्यावं आणि आवश्यक असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. परीक्षा आयुष्याचा शेवट नसून, संवाद आणि आधार मिळाल्यास अनेक टोकाचे निर्णय टाळता येऊ शकतात, असंही तज्ज्ञ सांगतात. जर तुमच्या ओळखीच्या कोणाला मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असतील, तर त्यांना तात्काळ सहकार्य करा आणि मदत मिळवून द्या.

