(नांदेड)
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट हॅक करून बोगस जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा धक्कादायक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. नांदेड जिल्ह्यातील सावळेश्वर या एका गावात अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 15 हजार नवीन जन्म प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, यामुळे महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सावळेश्वर ग्रामपंचायतीकडून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. यामागे आंतरराष्ट्रीय कट असून, परदेशातून यासाठी आर्थिक पुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सोमय्या हे अचानक नांदेडमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. नांदेड जिल्ह्यात जारी करण्यात आलेल्या सर्व जन्म प्रमाणपत्रांची चौकशी एका आठवड्यात पूर्ण केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सावळेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच केशव कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, पंचायत समिती कार्यालयाकडून पत्र आल्यानंतरच या गंभीर प्रकाराची माहिती मिळाली. ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती आणि हा प्रकार आमच्यासाठी धक्कादायक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी भावना कावळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांच्या तक्रारीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे. सरकारी यंत्रणांच्या वेबसाईटमध्ये घुसखोरी करून नागरिकत्वाशी संबंधित महत्त्वाच्या दस्तऐवजांची बनावट तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पातळीवर होण्याची शक्यता आहे.

