(पालघर)
गणेशोत्सवाच्या उत्साहात विरारमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. विरार (पूर्व) येथील विजयनगर, नारिंगी भागातील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, १५ ते २० जण मलब्याखाली अडकलेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत नऊ जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर दुर्घटना मंगळवारी रात्री सुमारे ११.३० वाजता घडली. कोसळलेला भाग शेजारच्या चाळींवर आदळल्याने दुर्घटना अधिक भीषण ठरली. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दल, पोलीस, महापालिका पथक आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या डॉग स्क्वॉडचाही वापर केला जात आहे.
सध्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र, इमारतीच्या आजूबाजूला चाळी व अरुंद गल्ल्या असल्याने मोठी यंत्रसामग्री (जेसीबी) घटनास्थळी पोहोचवणे कठीण झाले आहे. त्यामुळे बचाव कार्य हातानेच मलबा काढून सुरू ठेवले आहे.
ही इमारत जवळपास दहा वर्षांपूर्वी बांधलेली असून, पालिकेकडून तिला अतिधोकादायक घोषित केले गेले होते. अनेकदा नोटिसा देऊनही रहिवाशांनी ती रिकामी केली नव्हती. अखेर या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे व शोकाचे वातावरण आहे. नागरिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत असून, अशा धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याची मागणी होत आहे.

