(नवी दिल्ली)
दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्ययन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्ययन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (२४ जुलै) पार पडले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. जेएनयूसारख्या नामवंत विद्यापीठात मराठी भाषा आणि शिवचरित्रावर आधारित अभ्यास केंद्र स्थापन होणं ही संपूर्ण मराठी समाजासाठी गौरवाची बाब असल्याचं मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं?
“जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक दूरदृष्टीवर आधारित अभ्यास केंद्र आणि मराठी भाषा केंद्र स्थापन झालं, याचा मला विशेष आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतात ‘स्वराज्य’ स्थापन करणारे पहिले शासक होते. त्यांनी सागरी सुरक्षा आणि सामरिक ताकदीचं महत्त्व फार पूर्वीच ओळखलं होतं. त्यांनी समुद्रात अशा प्रकारे किल्ले बांधले की शत्रूंना आत प्रवेश करणं अशक्य होतं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्या काळी ब्रिटिश आणि पोर्तुगीजसारख्या शक्तीही भारतात यायला धजावत नव्हत्या. त्यांच्या कार्याचा अभ्यास या केंद्रात केला जाणार असून, हे एक अत्यंत अभिमानास्पद पाऊल आहे,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.