आयसीसी पुरुष अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इतिहास रचत इंग्लंड अंडर-19 संघाचा 100 धावांनी पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या या अंतिम सामन्यात मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकतर्फी वर्चस्व गाजवत पुन्हा एकदा तिरंगा फडकावला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात काहीशी अडखळती झाली. सलामीवीर आरोन जॉर्ज 9 धावांवर बाद झाला आणि संघाची पहिली विकेट 20 धावांवर पडली. मात्र, त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 चेंडूत 142 धावांची भक्कम भागीदारी करत डाव सावरला. आयुष म्हात्रे 51 चेंडूत 53 धावा काढून बाद झाला, ज्यामध्ये दोन षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता.
यानंतर वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडत ऐतिहासिक खेळी साकारली. त्याने अवघ्या 55 चेंडूत शतक झळकावत 175 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 15 षटकार ठोकले. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. यासह, युवा वनडे क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा वैभव सूर्यवंशी जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला.
भारताची धावसंख्या 308 वर पाच विकेट्स असताना अभिज्ञान कुंडू आणि आरएस अम्ब्रिस यांनी 51 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कुंडूने 31 चेंडूत 40 धावा केल्या, तर अम्ब्रिसने 18 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांत कनिष्क चौहानने नाबाद 37 धावा करत भारताला 412 धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडकडून जेम्स मिंटनने तीन बळी घेतले, तर सेबॅस्टियन मॉर्गन आणि ऍलेक्स ग्रीन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
412 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात संथ झाली. पहिल्या तीन षटकांत संघाला केवळ दोन धावा करता आल्या. सलामीवीर जोसेफ मूरसनने चौकारांची हॅटट्रिक करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो लवकरच बाद झाला. बेन डॉकिन्स आणि बेन मेयेस यांनी डावाला गती दिली. मेयेस 28 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला, तर कर्णधार थॉमस रेवन 31 धावांवर तंबूत परतला.
बेन डॉकिन्सने अर्धशतक पूर्ण केलं, मात्र 20 षटकांनंतर 171 धावांवर असलेल्या इंग्लंड संघाला भारतीय गोलंदाजांनी झटपट धक्के दिले. आयुष म्हात्रे, दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी निर्णायक टप्प्यावर विकेट्स घेत सामन्याची दिशा बदलली. सात बाद 177 धावांवर असताना इंग्लंडचा पराभव निश्चित झाला होता.
कालेब फॉकनरने एकाकी झुंज देत 67 चेंडूत 115 धावांची तडाखेबंद खेळी केली, मात्र ती अपुरी ठरली. अखेर इंग्लंड संघ 40.2 षटकांत 311 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 100 धावांनी दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं.
यासह भारत अंडर-19 विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. याआधी भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये विजेतेपद पटकावले होते. दुसरीकडे, इंग्लंड संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला असला, तरी 1998 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेलं एकमेव जेतेपदच त्यांच्या खात्यात आहे.
दरम्यान, अंडर-19 विश्वचषक जिंकूनही आयसीसीकडून विजेत्या संघाला थेट रोख बक्षीस दिलं जात नाही. ही स्पर्धा व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी नसून युवा खेळाडूंच्या विकासासाठी आयोजित केली जाते. आयसीसी सहभागी देशांच्या क्रिकेट मंडळांना विकास निधी देते. मात्र, बीसीसीआयकडून आपल्या खेळाडूंवर नेहमीच बक्षिसांचा वर्षाव केला जातो. यापूर्वीही अंडर-19 आणि महिला अंडर-19 संघांना कोट्यवधींची बक्षिसं देण्यात आली आहेत. यंदाही सहाव्यांदा विश्वविजेते ठरलेल्या आयुष म्हात्रेच्या संघासाठी बीसीसीआयकडून मोठ्या बक्षिसाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

