(मुंबई )
मुंबई : ICC Men’s T20 World Cup 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडवर थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 20 षटकांत 7 बाद 253 धावांचा भव्य डोंगर उभारला आणि इंग्लंडचा डाव 246 धावांवर रोखत 7 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. आता भारताचा अंतिम सामना रविवारी (8 मार्च) न्यूझीलंड विरुद्ध अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या Narendra Modi Stadium येथे रंगणार आहे.
भारताची आक्रमक फलंदाजी
सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. या सामन्यात संजू सॅमसन भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने अवघ्या 42 चेंडूत 89 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. सलामीवीर अभिषेक शर्मा मात्र मोठी खेळी करू शकला नाही आणि तो 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इशान किशन ने 18 चेंडूत 39 धावांची जलद खेळी करत भारताची धावगती कायम ठेवली.
मध्यफळीत शिवम दुबे ने 25 चेंडूत 43 धावा करत संघाला भक्कम आधार दिला. शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या (12 चेंडूत 27 धावा) आणि तिलक वर्मा (7 चेंडूत 21 धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताचा स्कोर 253 धावांपर्यंत नेला. इंग्लंडकडून गोलंदाजीत आदिल रशीद आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
इंग्लंडची डळमळीत सुरुवात
254 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट याला हार्दिक पांड्या ने अवघ्या 5 धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार हॅरी ब्रूक ला जसप्रीत बुमराह च्या गोलंदाजीवर अक्षर पटेल ने झेलबाद केले. त्यानंतर जोस् बटलर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, मात्र फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती ने त्याला 25 धावांवर बाद केले. बटलर बाद झाला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 3 बाद 64 अशी झाली होती.
जेकब बेथलचे शतक व्यर्थ
या संकटाच्या वेळी जेकब बेथल आणि विल जॅक्स यांनी दमदार भागीदारी करत इंग्लंडला पुन्हा सामन्यात आणले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 39 चेंडूत 77 धावांची भागीदारी करत भारताचे टेन्शन वाढवले. जेकब बेथल ने शानदार फलंदाजी करत 105 धावांची खेळी केली आणि इंग्लंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र शेवटी भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडचा डाव 20 षटकांत 7 बाद 246 धावांवर रोखला.
बुमराह आणि पांड्याची निर्णायक भूमिका
इंग्लंडच्या फलंदाजांकडून जोरदार प्रतिकार होत असताना जसप्रीत बुमराह ने मोक्याच्या क्षणी प्रभावी गोलंदाजी करत भारताला मोठा दिलासा दिला. शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या ने अचूक गोलंदाजी करत इंग्लंडला लक्ष्यापासून दूर ठेवले. त्याने या सामन्यात सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
भारताचा ऐतिहासिक विक्रम
भारताचा 253 धावांचा स्कोर अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला.
- टी-20 विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यांमधील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.
- टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
- याच विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध भारताने 256 धावा केल्या होत्या.
- 2007 मध्ये श्रीलंकेने केनियाविरुद्ध केलेल्या 260 धावांच्या विक्रमापासून भारत फक्त 7 धावांनी कमी पडला.
सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यात 253 धावा करणारा भारत हा विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या करणारा संघ ठरला आहे.
अंतिम फेरीत भारत-न्यूझीलंड आमनेसामने
या विजयामुळे भारत अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीलंकेनंतर दुसरा यजमान संघ ठरला आहे. यापूर्वी 2012 मध्ये श्रीलंकेने हा पराक्रम केला होता. आता रविवारी (8 मार्च) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना रंगणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना अत्यंत रोमांचक ठरणार आहे.

