( मुंबई )
डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात आता केवळ त्यांचे पती अनंत गर्जे यांच्याविरोधातच खटला चालवला जाणार आहे. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात गर्जे कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने 28 जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होते. भाजप नेत्या तथा कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या अनंत गर्जे यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणालाही आरोपी ठरवण्यासाठी पुरावे उपलब्ध नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
या प्रकरणातील एकमेव आरोपी अनंत गर्जे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून, मुंबई सत्र न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आरोपीच्या वतीने वकील मंगेश देशमुख यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितलं की, पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे, त्यामुळे आता आरोपीकडून चौकशीसाठी काहीही शिल्लक नाही. अनंत गर्जे यांनी तपासात पूर्ण सहकार्य केल्याचा दावा करत, तपास पूर्ण झाल्याने त्यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली.
मात्र, मुंबई पोलिसांच्या वतीने या जामीन अर्जाला जोरदार विरोध करण्यात आला. तपास यंत्रणेच्या मते, आरोपीने तपासात अपेक्षित सहकार्य केलेलं नाही. त्याची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो तसेच पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे. शिवाय, ही एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी संबंधित अतिशय संवेदनशील घटना असल्यामुळे आरोपीला जामीन देऊ नये, अशी भूमिका विशेष तपास पथकाने न्यायालयात मांडली.
या प्रकरणात सुरुवातीला अनंत गर्जे यांच्यासह त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि भाऊ अजय गर्जे यांनाही आरोपी करण्यात आलं होतं. त्यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासादरम्यान हे दोघेही फरार झाले होते. मात्र, त्यांचा शोध सुरू असतानाच मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. पुढील तपासात त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा न सापडल्याने, मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात शीतल गर्जे-आंधळे आणि अजय गर्जे यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
गौरी यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, अनंत गर्जे यांचे अन्य महिलेसोबत संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर गौरीला सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. या छळामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात अनंत गर्जे यांनी चौकशीदरम्यान पत्नीला मारहाण केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान सरकारी वकील, गौरी यांच्या वतीने अॅड. सुबीर सरकार आणि आरोपीच्या वतीने अॅड. मंगेश देशमुख यांनी युक्तिवाद केला. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांच्या ताब्यात अनंत गर्जे यांच्या काही ऑडिओ क्लिप्स आहेत. यापैकी एक सुमारे 20 मिनिटांची ऑडिओ क्लिप स्वतः अनंत गर्जे यांनी रेकॉर्ड केलेली असून, त्यात त्यांनी गौरीला मारहाण केल्याची कबुली दिली आहे.
या संभाषणातून अनंत गर्जे गौरीला वेळ देत नसल्याचे, तसेच आपल्या जुन्या प्रेमप्रकरणाबाबत घरच्यांना काही सांगितले तर आत्महत्या करेन, असे दबाव आणि धमकी देत असल्याचेही समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय, गौरी यांनी मृत्यूपूर्वी आपल्या मैत्रिणीला पाठवलेल्या व्हिडिओ क्लिप्सदेखील महत्त्वाचे पुरावे असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
डॉ. गौरी पालवे यांनी त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केल्यानंतर पती अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, तपास पुढे जात असताना या प्रकरणात अनंत गर्जे यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणाचाही सहभाग असल्याचे ठोस पुरावे मिळाले नसल्याचं मुंबई पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 111 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.
तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्यानंतर आरोपीची पुन्हा चौकशी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने अनंत गर्जे यांना न्यायालयीन कोठडीतून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. जामीन अर्जात अनंत गर्जे हे तपास आणि चौकशीत पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अनंत गर्जे यांचे वकील मंगेश देशमुख यांनी सांगितलं की, डॉ. गौरी यांच्या मृत्यूमागचं सत्य काय आहे ते लवकरच पुराव्यांसह समोर येईल. अनंत गर्जे यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही. या आत्महत्येमागे काही कौटुंबिक कारणं आहेत, मात्र ती कारणं सार्वजनिक करण्यासारखी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

