(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवार, ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला पारंपरिक धार्मिक विधींनी सुरुवात झाली. घटस्थापना, वैदिक मंत्रोच्चार, अभिषेक आणि तोफेच्या सलामीने मंदिर परिसर भक्तिमय झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती, दर्शनरांगेतून तब्बल १ लाख ३७ हजार ९२१ भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यंदाच्या उत्सवात कृत्रिम बुद्धिमत्तेसह विविध सुविधांचा वापर करण्यात येत आहे.
मंदिराचे दरवाजे पहाटे पावणेपाच वाजता उघडण्यात आले. त्यानंतर घंटानादाच्या गजरात सकाळच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. देवीचा अभिषेक आणि आरती झाल्यानंतर घटस्थापनेसाठी पुरोहित व श्रीपूजकांनी वैदिक मंत्रोच्चारात पूजेची तयारी केली. शेखर मुनिश्वर कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापनेचा विधी पार पडला. पंचांगकर्ते किरण लाटकर, नितीन मुनिश्वर, देवस्थानचे कर्मचारी आणि वाजंत्री यांच्या उपस्थितीत देवीच्या मुख्य गाभाऱ्यात घटाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर परंपरेनुसार तोफेची सलामी देऊन नवरात्रोत्सवाचा प्रारंभ जाहीर करण्यात आला.
अंबाबाई मंदिरातील तोफेच्या सलामीची परंपरा जाधव कुटुंबीयांनी गेल्या ११ पिढ्यांपासून अखंडपणे जपली आहे. घटस्थापनेनंतर सनई-चौघडे आणि ताशांच्या निनादात देवीची उत्सवमूर्ती गाभाऱ्यात घटाशेजारी विराजमान करण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची पाद्यपूजा, अभिषेक आणि कुंकूमार्चन करण्यात आले. देवस्थानचे पुरोहित प्रमोद उपाध्ये आणि बाळासाहेब दादर्णे यांनी वेदोक्त पद्धतीने पूजा केली. या वेळी सौ. राठोड, समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, धर्म मार्गदर्शक गणेश नेर्लेकर देसाई आणि व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची श्री नंदादेवी स्वरूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. नवरात्रातील पुढील दिवसांतही देवीची विविध रूपांत अलंकार पूजा केली जाणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता आहे. रविवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. स्थानिक भाविकांसह बाहेरगावाहून आलेल्या भक्तांचीही मोठी उपस्थिती दिसून आली. पहिल्या दिवसापासूनच मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.
दरम्यान, कोल्हापुरातील नामांकित सराफांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे १७ किलो वजनाचा चांदीचा गजराज अर्पण केला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रविवारी दिवसभर अनेक नामांकित कलाकारांनी मंदिरात आपली कला सेवास्वरूपात सादर केली. धार्मिक विधी, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि भाविकांच्या गर्दीमुळे करवीर नगरीत नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.


